शंकराचार्य थांबवले गेले—हे कुणाचं राज्य आहे?
रविवारी मौनी अमावस्या होती. सनातन धर्मात या दिवशी गंगास्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. करोडो सनातनी श्रद्धेने गंगेत स्नान करतात. मात्र याच पवित्र दिवशी सनातन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या शंकराचार्यांनाच “परवानगी नसल्याने” गंगास्नानापासून रोखले जाते हेच बहुधा नव्या भारतातील नव्या सनातनाचे लक्षण असावे!
सर्वस्व त्याग करून चप्पल न घालणारे शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना मोदी अँड कंपनीविरोधात आंदोलन करावे लागते, धरणे द्यावे लागते, अपमान सहन करावा लागतो आणि तरीही प्रशासनाला काहीच वाटत नाही. उलट उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांच्या शिष्यांवर लाठीहल्ला केला, केस ओढले, साधूंना फरफटत पोलीस ठाण्यात नेले. हे सर्व प्रयागराजसारख्या पवित्र नगरीत घडते जिथे गंगा वाहते, पण संवेदना कोरड्याच दिसतात.
मौनी अमावस्येच्या दिवशी शंकराचार्यांची पालखी उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखली. “संगमावर जाऊ नका” असा आदेश दिला गेला. शंकराचार्यांनी तो मान्य केला नाही, कारण गंगास्नानासाठी सरकारी परवानगी लागते हे शास्त्रात कुठेही लिहिलेले नाही. त्यानंतर एका साधूला बेदम मारहाण करण्यात आली, हा व्हिडिओ व्हायरल झाला पण सरकार मात्र मौनात.

दोन तास समजावून सांगितल्यानंतर पोलिसांनी शंकराचार्यांचे अनेक शिष्य ताब्यात घेतले. स्वतः शंकराचार्य आणि पालखीला ओढत संगमापासून एक किलोमीटर दूर नेण्यात आले. परिणामी, शंकराचार्यांना गंगास्नान करता आले नाही. प्रयागराजच्या संगम तटावर “दिव्य-भव्य” नव्हे, तर थेट संघर्ष घडला. शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितले “मला गंगास्नान करायचे आहे. जोपर्यंत ते होणार नाही, तोपर्यंत मी येथून जाणार नाही.”
परंतु प्रशासनाने सांगितले “तुम्ही विनापरवानगी आला आहात.”
प्रश्न असा आहे की, मग कोट्यवधी भाविक परवानगी घेऊन येतात का? शंकराचार्यांचे शिष्य देवेन पांडे यांनी विचारलेला हा साधा प्रश्न प्रशासनाकडे उत्तर नसलेला आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की, कुंभमेळ्यात मृत्यू पावलेल्या भाविकांबाबत त्यांनी सरकारला जबाबदार धरले होते. त्याचाच हा सूड घेतला जात आहे. सरकार सांगते की मौनी अमावस्येला चार कोटी लोकांनी स्नान केले पण हे आकडे आणि प्रत्यक्ष व्यवस्था यांचा मेळ कुठेच बसत नाही.
या घटनेनंतर ‘कम्प्युटर बाबा’ यांनी शंकराचार्यांच्या समर्थनार्थ जमिनीवर झोपून धरणे आंदोलन सुरू केले. ते म्हणाले, “महाकुंभ सरकारचा नाही, तो सनातन धर्माचा आहे. आज संतांचा अपमान होत आहे, सनातनावर हल्ला होत आहे.” काँग्रेस, समाजवादी पक्षाचे नेते, तसेच विविध स्तरांतून उत्तर प्रदेश सरकारवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जात आहे.

साधूचे केस ओढण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?
कोणी म्हणते जर हा प्रकार पाकिस्तान किंवा बांगलादेशात घडला असता, तर आतापर्यंत निषेधाचे मोर्चे निघाले असते. पण इथे? इथे तर “सनातन रक्षक” सत्तेत आहेत! आज शंकराचार्यांवर झालेला हल्ला हा एका व्यक्तीवर नाही तो थेट धर्मावर आहे. प्रश्न असा आहे की, चुकीला चुकीचे म्हणण्याचीही मुभा उरली आहे का? की जे संघ सांगेल तेच धर्म, आणि जे सरकार सांगेल तेच सनातन? जर तसे असेल, तर मग गंगा वाहत राहील… पण श्रद्धेचा गळा रोज कुठे ना कुठे आवळला जाईल.
