नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतापुर ता.मुखेड येथील एका महिला शिक्षिकेचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी झाल्यानंतर ते 40 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले तेंव्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या सहशिक्षिकेला निलंबित केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर परतापूर ता.मुखेड जि.नांदेड येथे सहशिक्षीका पदावर राजेश्री रामराव धमणे या कार्यरत आहेत. त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय लातूर यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांनी सादर केलेल्या अहवालाप्रमाणे राजश्री धमणे यांचे दिव्यांग प्रमाणपत्र 25 टक्यांचे निर्गमित करण्यात आले आहे. जे शासकीय सेवेसाठी लागणाऱ्या 40 टक्के पेक्षा कमी आहे.
या चुकलेल्या प्रमाणपत्राला जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेतलेले असून महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 च्या कलम 3 चा भंग झाल्याने राजश्री धमणे यांना 16 जानेवारी 2016 पासून निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात त्यांचे निलंबन मुख्यालय गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार हे कार्यालय असेल.
दिव्यांग प्रमाणपत्रातील फरक शिक्षिकेला भोवला ; निलंबन
