दिव्यांगतेवर मात करत कलागुणांचा उत्सव; नांदेडमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

नांदेड – दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात भव्य व प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सुमारे ५८ मुकबधीर, अंध, मतिमंद व अपंग विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सशक्त दर्शन घडविले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महान समाजसुधारिका हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, सहाय्यक संचालक दिनकर नाठे, अधिक्षक बळीराम येरपूलवार, माजी प्राचार्य पंजाबराव अंभोरे, डॉ. सान्वी जेठवाणी, भार्गवी देशमुख, सुधीर फुसांडे, रमेश वडगावकर, सीएम फेलो भार्गवी मुंढे, अर्थव मुळक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवार, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, साईचरण मुगावे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांगतेवर मात करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण प्रेक्षागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ‘गाडी झुमक्याची’, ‘शेतकरी नृत्य’, ‘चला जेजुरीला जाऊ’, ‘राधे-राधे’, ‘मल्हारी मिक्स’, ‘दैवत छत्रपती’, ‘दोनच राजे इथे गाजले’, ‘काठी न घोंगड घेऊद्या की’, ‘राणू मुंबई की राणू’, ‘आदिवासी ठेमसा’, ‘आया रे तुफान-छावा’, ‘रिमिक्स जलवा’, ‘माऊली-माऊली’ तसेच गरीब मुलांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षावर आधारित सादरीकरण, भावगीत, लावणी व गीतगायन अशा विविध सादरीकरणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, जिद्द व कलागुणांचे विशेष कौतुक करत दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन केले.याच कार्यक्रमात नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद दी चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त होणाऱ्या भव्य विशेष कार्यक्रमाबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. या संदर्भातील माहिती देऊन संबंधित गीत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले यांनी केले, तर निखिल किरवले व सारिका सावळे यांनी दुभाष्य म्हणून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!