नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबरमध्ये संसदीय अधिवेशनात पारीत करण्यात आलेल्या जीएमजी कायदा 2025 यामध्ये आता नव्याने ग्रामीण भागातील रोजगारांना हक्काचे रोजगार मिळण्यासाठी हा कायदा पारीत करण्यात आला आहे. मुळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू होती. याच योजनेचा दुसरा भाग म्हणून या जीएमजीकडे बघता येणार आहे. यातून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 2045 च्या विकसीत भारताच्या वाटचालीकडे हा महत्वाचा आणि प्रभावी ठरणारा घटक असल्याचे मत खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, ऍड. किशोर देशमुख, माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हा प्रवक्ता चैतन्य बापू देशमुख, निलेश पावडे, लक्ष्मण ठक्करवाड यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी खा.अशोक चव्हाण पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताची संकल्पना मांडली आणि या संकल्पनेला साकार करण्यासाठी जीएमजी हा कायदा प्रभावी ठरणार आहे. हा 4 क्षेत्रात काम केल जाणार आहे. यात जलसुरक्षा आणि जलसंवर्धन, मुलभुत ग्रामीण पायाभुत सुविधा, उपजिवीका आधारीत पायाभुत सुविधा आणि चौथा आपत्ती प्रतिबंध कामे या चार क्षेत्रात काम केल जाणार आहे. यातून ही सर्व जबाबदारी ग्राम पंचायत कार्यालय यांच्यावर देण्यात आली असून यांनी या कामाच्या बाबतीतला सर्व आराखडा शासनाकडे पाठवावा. कामाची मागणी शासनाकडे करावी. कामाची मागणी शासनाकडे केल्यानंतर 15 दिवसात त्या कामाला मंजुरी मिळणार आहे. एकंदरीत ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा कायदा प्रभावी ठरणार आहे. याच बरोबर त्यांनी महानगरपालिकेत मिळालेल्या यशाबद्दलही बोलत असतांना म्हणाले की, अपेक्षीत प्रमाणे यश मिळाले नाही. आम्ही 50 जागांची अपेक्षा केली होती. पण 45 जागांवर समाधान मानावे लागले. काही अधिकार्यांच्या चुकीमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला. तीन ते चार जागा आमच्या कमी मतांच्या फरकाने पराभूत झाल्या आहेत. यासाठी आम्ही फेर मतमोजणीची मागणी केली होती. पण त्या ठिकाणच्या अधिकार्यांनी ही मागणी फेटाळून लावली. अन्यथा आम्ही 50 चा आकडा सहज गाठू शकलो असतो. याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांनी माझ्या विरोधात प्रचार केला. एवढेच नाही तर मला शिव्या देण्याचे काम सुध्दा केले. पण आज विरोधक कोठे आहेत. ते दिसून येत नाहीत. कदाचित ते नांदेड-मुंबई विमान सेवा सुरू झाल्यामुळे बॅगा घेवून ते मुंबईला गेले असतील अशी टिपणीही अशोक चव्हाण यांनी केली.
नंादेड शहरात 24 आणि 25 जानेवारी रोजी शिख धर्मियांचे 9 वे गुरू गुरु तेग बहादुर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि.24 आणि 25 जानेवारी हे दोन दिवस नांदेड दौर्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी नांदेडसह मराठवाड्यातील जनतेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही खा.अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.
मनरेगाच्या जागी जीएमजी; ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार चालणा-खा.अशोक चव्हाण
