लेक वाचवा लेक शिकवा अभियान; जनजागृती करण्यास चिमुकले सरसावले
नांदेड- जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अल्पवयीन मुलामुलींचे विवाह होत असतील तर त्यासंबंधीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. त्यामुळे मुख्य आरोपीसह मंगल कार्यालय, वाजंत्री, मंडप डेकोरेशन अशा सुविधा पुरविणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सद्या बालविवाहाविरोधात मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी बालविवाहमुक्तीसाठी सायकल शर्यतीत सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष किशनराव गच्चे, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, पांडुरंग गच्चे यांची उपस्थिती होती.
बालविवाहमुक्तीसाठी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील लोकांमध्ये बालविवाहाबाबतीत जागरुकता होणे गरजेचे आहे. कारण त्यांची मानसिकता बालविवाहास अनुकूल असतो. त्यासाठी लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत यासंबंधाने उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शाळेच्या वतीने गावातील ग्रामस्थांसाठी सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यास शाळेतील चिमुकल्यांनी प्रतिसाद दिला. शर्यतीच्या सुरुवातीला बालविवाहमुक्तीचे नारे देण्यात आले. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष किशनराव गच्चे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. गावातील मुख्य रस्त्यावरून या शर्यतीचे आयोजन केले. शर्यतीनंतर विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पारितोषिके वितरीत करण्यात आली.
