दिव्यांग सक्षमीकरणासाठी समाजाने ठामपणे पुढे यावे – शरद देशपांडे

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन

नांदेड = दिव्यांगता ही उणीव नसून दृष्टीपेक्षा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा आहे. दिव्यांग व्यक्तींमध्येही इतरांप्रमाणेच प्रगती करण्याची क्षमता असून, त्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड येथील सायन्स कॉलेज मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे क्रीडाज्योत प्रज्वलन करून आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, सीएम फेलो भार्गवी मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, बळीराम येरपूलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सचिव शरद देशपांडे पुढे म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती केवळ शारीरिकदृष्ट्या अडचणीत असतात; मात्र त्यांच्या क्षमतांमध्ये कोणतीही कमतरता नाही. योग्य संधी, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन भरीव योगदान देऊ शकतात.यावेळी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अनेकदा विशेष शाळांतील शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांची पालकांप्रमाणे काळजी घेतात. या स्पर्धा उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडल्या पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिव्यांग क्रीडा शपथ घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोलीस बँडच्या सुरेल साथीत आकर्षक पथसंचालन केले. हिरवा झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धांना औपचारिक सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत गंजेवार यांनी केले. सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले यांनी केले. विद्यार्थ्यांना भाषणे समजावून सांगण्यासाठी निखिल किरवले व साईनाथ ईप्तेकर यांनी दुभाष्य म्हणून काम पाहिले.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा आज

जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या वतीने मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता, नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!