मतदारांना मतदानाच्या दिवशी 15 जानेवारी रोजी मतदानासाठी सुट्टी

नांदेड – नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी सदर क्षेत्रातील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी सुट्टी अथवा दोन ते तीन तासांची सवलत देण्यात येणार आहे.

त्यानुसार मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेबर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.

ही सुट्टी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील. जसे राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी.

अपावादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याची  दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे 30.12.2025 रोजीच्या शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त अ.गो. थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!