उमरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोळेगाव येथे पत्नीबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उमरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे.
गोळेगाव (ता. उमरी) येथील रहिवासी सुनिता मारुती बोईनवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मौजे गोळेगाव येथे हा प्रकार घडला. त्यांच्या पती मारुती चंदू बोईनवाड यांनी पत्नीबाबत काढलेले अपशब्द साहेबराव बाळू दारकूबोईनवाड यांना खटकले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी साहेबराव बाळू दारकूबोईनवाड यांनी शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याने मारुती चंदू बोईनवाड गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 04/2026 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी साहेबराव बाळू दारकूबोईनवाड याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे करीत आहेत.
