मुख्यमंत्री फाईल हातात, कॅमेऱ्यासमोर; तपासही ओपन टू ऑल!
पश्चिम बंगालमध्ये 2020 चा कोळसा घोटाळा आता कोळसा नसून राजकीय कोळसा बनला आहे. गुन्हा जुना, पण धूर मात्र निवडणुकीच्या आधीच जास्त निघतोय हे विशेष! ईडी म्हणते, “आम्ही कोळसा शोधायला आलो होतो.” पण योगायोग असा की, सापडली ती आयपॅक निवडणूक जिंकवणारी फॅक्टरी!
छापा कार्यालयावर, छापा मालकाच्या घरी, आणि धडाम! मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थेट मैदानात. फाईल हातात, कॅमेरे समोर, आणि संदेश स्पष्ट “तपास नाही, तर तपासाच्या नावाखाली राजकारण!” इकडे ईडी अधिकाऱ्यांना पाहून पश्चिम बंगाल पोलीस विचारतात “तुम्ही कोण? कुठून आलात? कोणाच्या सांगण्यावरून?” जणू ईडी नव्हे, तर एखादा बिनआमंत्रित पाहुणा! गोंधळ वाढला, म्हणून ईडी थेट उच्च न्यायालयात. तक्रार “मुख्यमंत्री पुरावे घेऊन निघून गेल्या!”हो, कारण बंगालमध्येफाईलही राजकीय असते आणि चालणंही राजकीय असतं! ममता बॅनर्जी म्हणतात “मी भाजपच्या कार्यालयात घुसले तर चालेल का?”

खरंच, केंद्रीय एजन्सी विरोधकांच्या दारात गेल्या की तपास, आणि विरोधकांनी एजन्सीला प्रश्न विचारले की गुन्हा! अखिलेश यादव सांगतात “भाजपला बंगालमध्ये हार दिसतेय.” तृणमूल म्हणते “लोकशाही आजारी, एजन्सी अॅक्टिव्ह!” भाजप म्हणते “सगळं कायदेशीर!” आणि देश पाहतोय कालचे भ्रष्टाचारी आज पवित्र, कालचे गुन्हे आज माफ, कारण ते सध्या ‘वॉशिंग मशीन’च्या योग्य साइडला आहेत! निवडणूक जिंकायची असेल तर नेते बदलतात, पक्ष फुटतात, आणि कंपनीवर छापे पडतात! एकूण काय तर, बंगालमध्ये लढत मतपेटीची कमी आणि एजन्सींची जास्तच दिसतेय. कारण सत्ता हवीच आहे मग ती सामाने येवो, दामाने येवो, दंडाने येवो, की भेदाने येवो!
