दीपोत्सव,शाहिरी जलसा, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन
नांदेड- राजमाता जिजाऊ सृष्टी, जानकी नगर, हनुमानगढ नांदेड येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि 11 व सोमवार 12 जानेवारी 2025 रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा जन्मोत्सव पार पडणार आहे.
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवार, दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळी 07.00 वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सोमवार, दि.12 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांना अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी जिजाऊ सृष्टी सकाळपासून रात्रीपर्यंत जिजाऊ प्रेमी, शिवप्रेमी व नागरिकांसाठी अभिवादनासाठी खुली असणार आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी याच ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शाहिरी जलशाचे आयोजन करण्यात आले असून, यात सुप्रसिद्ध शाहीर प्रा.डॉ.शिवराज शिंदे आणि सुप्रसिद्ध निवेदक मुरलीधर हंबर्डे हे स्वराज्य संकल्पिका स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांचा इतिहास शाहिरीच्या माध्यमातून उलगडतील. या दोन दिवसीय कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन राजमाता जिजाऊ सृष्टीचे संकल्पक अविनाश कदम यांनी केले आहे.
