नांदेड – शनिवारची सायंकाळ, गार–गार कातरवेळ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह इतर स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अमृत महोत्सवी पळसपान वार्षिक स्नेहसंमेलन सोसायटीच्या खुल्या मंचावर अत्यंत उत्साहात संपन्न झाले या संमेलनात प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहारदार आणि रंगतदार सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए, डॉ प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित चौथ्या पळसपान स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोसायटीच्या सदस्या सौ.अनुजा डोईफोडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती अलीभाई पंजवानी होते. व्यासपीठावर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, सचिव सौ. श्यामल पतकी, सदस्य अँड. प्रदीप नागापूरकर, नौनिहालसिंग जहागीरदार, दीपनाथ पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती.

संमेलनात सोसायटी अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज व पीपल्स हायस्कूल मधील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गीत गायन, काव्यवाचन, नृत्य, एकपात्री अभिनय, उत्कुष्ट वेशभूषा आदि विविध कलागुण सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मुख्याध्यापक नितीन सेलमोकर यांनी गायलेल्या गीताला उपस्थितांनी दाद दिली. विश्वास अंबेकर यांच्या भक्तिगीताने भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यांना पीपल्स हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष नौनिहालसिंग जहागीरदार यांनी तबल्यावर साथ दिली. सौ. अनिता गुंडेवार यांच्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर विश्वास अंबेकर यांचा एकपात्री अभिनय सामाजिक संदेश देऊन गेला. सौ. अनिता सुरोशी यांच्या स्वराज्याची जननी जिजाऊ या भूमिकेने प्रेक्षकांना भारावून टाकले. प्रतीक्षा सुर्वे यांनी सादर केलेल्या ‘व-हाड निघालं लंडनला’ विनोदी एकपात्री अभिनयाने चांगलीच टाळ्यांची दाद मिळवली. स्नेहा गायकवाड यांच्या लावणीने संमेलनाची रंगत वाढवली.
काव्यमैफिलीत सीए डॉ. प्रवीण पाटील, डॉ. रेखा वाडेकर, प्रा. तुकाराम बोईनवाड, श्यामसुंदर गोरे, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. प्रीती यादव, अनिता सुरोशे, दत्ता गच्चे, स्मिता चालीकवार यांनी काळजाचा ठाव घेणाऱ्या कवितांचं सादरीकरणाने नांदेड एज्युकेशन सोसायटीचा मंच काव्यमैफलीत रंगून गेला होता. डॉ. दत्ता गच्चे आणि मनोहर राठोड यांनी धमाल उडवित उपस्थित श्रोत्यांनाही नृत्य करायला भाग पाडले .

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर-कर्मचारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये डॉ. विकास सुकाळे (वरीष्ठ महाविद्यालय पीपल्स कॉलेज, नांदेड), डॉ. राजेश सोनकांबळे (कनिष्ठ महाविद्यालय पीपल्स कॉलेज, नांदेड), वामन कुलकर्णी (शिक्षकेत्तर कर्मचारी, पीपल्स कॉलेज, नांदेड), डॉ. संगिता मोदी (वरीष्ठ महाविद्यालय सायन्स कॉलेज, नांदेड), प्रा. मारोती डुरके (कनिष्ठ महाविद्यालय सायन्स कॉलेज, नांदेड), अनिल थोरात (शिक्षकेत्तर कर्मचारी, सायन्स कॉलेज, नांदेड), सौ. प्रफुल्लता फुलारी (उत्कृष्ट शिक्षक, पीपल्स हायस्कुल, नांदेड), विश्वास अंबेकर (शिक्षकेत्तर कर्मचारी, पीपल्स हायस्कुल, नांदेड), कचरु रासे (कार्यालय, नांदेड एज्युकेशन सोसायटी, नांदेड) यांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कदम व श्रद्धा सावले यांनी केले.
