डंका नाही, ढोल फुटलाय: ट्रम्पच्या एका वाक्यात भारताची पोलखोल
व्हेनेझुएला देशावर आक्रमण करून एका देशाच्या राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना थेट ताब्यात घेऊन अमेरिकेत आणले जाते, न्यायालयासमोर उभे केले जाते आणि त्यांच्यावर हत्यार व अमली पदार्थांचे आरोप लावले जातात. आंतरराष्ट्रीय कायदे, सार्वभौमत्व, मुत्सद्देगिरी या सगळ्या संकल्पना जणू सुट्टीवर गेलेल्या असतात.
यानंतर एअर फोर्स वन या विमानात पत्रकारांशी गप्पा मारताना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अत्यंत हलक्याफुलक्या शैलीत म्हणतात,
“मोदी इज व्हेरी गुड … आणि त्याला माहीत आहे की त्याने मला खुश करायलाच हवे, आणि तो तसंच करत आहे.” वा! राष्ट्रप्रमुखांमधील संवाद की एखाद्या कॉर्पोरेट बॉसने कर्मचाऱ्याला दिलेला सकाळचा फीडबॅक हे कळायलाच मार्ग नाही. इतकेच नव्हे, तर एका खासदाराशी रशियाबाबत चर्चा सुरू असताना ट्रम्प त्या खासदाराच्या तोंडातले शब्द काढून घेत स्वतःच सांगतात,“आता मोदी आपले ऐकणार आहेत आणि रशियाकडून तेल खरेदी थांबवणार आहेत.”
इथे प्रश्न असा आहे की, जर चर्चा देशाबद्दल होती, तर मोदी हे वैयक्तिक नाव का?
आणि जर नाव घेतलेच, तर ते भारताच्या पंतप्रधानांशी, आणि परिणामी भारताशी जोडले जाणार नाही का? मग ही भारताची अब्रू नाही का? एवढी अब्रू रोजच्या रोज सहन करण्यामागे नेमकं नरेंद्र मोदींकडे असं काय आहे, की डोनाल्ड ट्रम्प पुढच्या वक्तव्यातही तितक्याच सहजतेने बोलत राहतात? पाकिस्तानच्या लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्यासोबत चर्चा, रात्रीचा भोज, चार-चार वेळा आमंत्रण त्यांची पात्रता तरी काय, असा प्रश्न विचारण्याऐवजी आपण हे सगळं नॉर्मल मानायचं?
एका देशावर आक्रमण, राष्ट्रपती अटक, आणि लगेच भारतावर भाष्य हे नेमकं कोणतं आंतरराष्ट्रीय सूत्र आहे? आणि मग प्रश्न उभा राहतो ही अवमानना सहन का केली जाते? उत्तर का दिलं जात नाही? असे अनंत प्रश्न आज उपस्थित आहेत. काहींच्या मते 2018 पासूनच नरेंद्र मोदी अशा एका जाळ्यात अडकले आहेत की बोलले तर अडचण, न बोलले तरी अब्रूची धूळधाण. म्हणूनच शांतता जी आता मुत्सद्देगिरी नसून मौनाची सवय झाली आहे.
देशासाठी काम करत असाल, तर तुमचं वैयक्तिक नाव का घेतलं जातं?
देशाबद्दलच का बोललं जात नाही? याचा अर्थ स्पष्ट आहे—भारताची विदेशनीती आज इतकी खालच्या स्तरावर गेली आहे की जागतिक पातळीवर कोणतंही ठोस यश दिसत नाही. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी एकही देश भारतासोबत उभा राहिला नाही. पाठिंबा शून्य. म्हणजेच विदेशनीतीचा दिवाळखोरपणा अधिकृतपणे जाहीर झाला.
ट्रम्प यांच्या वक्तव्यांनंतर मोदीजींची कार्टून—ट्रम्प यांच्या पायाशी झोपलेली—अनेक माध्यमांत झळकली. देशात याचा परिणाम किती नकारात्मक होतो, याचा विचार पंतप्रधानांना का येत नाही? उत्तर देण्याची गरज का वाटत नाही? डोनाल्ड ट्रम्प 50 पेक्षा जास्त वेळा सांगतात की भारत-पाकिस्तानमधील युद्ध त्यांनी थांबवले. कसे कोणत्या अधिकाराने? आणि भारतीय सैन्य विजयाच्या उंबरठ्यावर असताना ते का थांबले हा प्रश्न प्रश्नच राहतो.
तेलाचा खेळ तर वेगळाच. ज्या देशाकडे पुढील 800 वर्षे जगाला पुरेल इतका तेलसाठा आहे, त्या देशाच्या राष्ट्रपतींना हत्यार व ड्रग्सच्या नावाखाली पकडून आणले जाते. आणि इथे गोदी मीडिया सांगते मोदींचा डंका जगभर वाजतोय!
जर तो डंका खरंच वाजत असता, तर ट्रम्प यांची हिंमत झाली असती का “मोदी मला खुश करत आहेत” असं बोलायची? “फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प” ही संकल्पना इथेच संपते. कारण ट्रम्प मित्र नाहीत ते व्यवसायिक आहेत.आणि आज ते जगाला दाखवू इच्छितात की संपूर्ण जग माझ्या इशाऱ्यावर नाचू शकतं. त्यासाठीच ते दुसऱ्या देशांच्या राष्ट्रपतींना पकडून अमेरिकेत आणतात. पण प्रश्न राहतो कोणता आंतरराष्ट्रीय कायदा आहे, जो हे परवानगी देतो?
मोदीजींनी बाजारपेठा उघडण्याची आश्वासनं दिली, अरावलीही देण्याची तयारी दाखवली. अडाणीचा मुद्दा जुना झाला आता नवे मुद्दे आलेत. पण तरीही एक मूलभूत प्रश्न उरतोच कोणत्याही देशाचा राष्ट्रपती दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल अशा खालच्या पातळीवर बोलू शकतो का?
आज सगळं राजकारण हिंदू–मुस्लिम एवढ्यावर येऊन थांबलं आहे.
देशाचं भलं काय, याकडे गेल्या 11 वर्षांत कोणी पाहिलं नाही.
भारताची विदेशनीती आज इतकी खाली घसरली आहे की पंतप्रधानांची अशी अवस्था यापूर्वी कधीच झाली नाही. तरीही गोदी मीडिया सांगते डंका वाजतोय! खरं तर ढोल फुटलाय. आणि सर्वात मोठा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना कोणी विचारत का नाही, “तुम्ही भारताच्या पंतप्रधानांबद्दल असे शब्द का वापरता?” ट्रम्प म्हणतात, “मोदींना माहीत आहे की मी नाराज आहे, म्हणून ते मला खुश करत आहेत.” हे ब्लॅकमेलिंग नाही तर काय?या प्रश्नाचं उत्तर आजतागायत मिळालेलं नाही आणि कदाचित मिळणारही नाही.
