हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड –  “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, गुरुद्वारा प्रशासन तसेच विविध समाजातील अशासकीय सदस्यांचा सहभाग असलेल्या २५ विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्येक समितीने आपापली नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नाकर गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे जगदीश सकवान, मुख्यमंत्री सहायता निधी राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजितसिंघ कडेवाले, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.

नांदेड येथे राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी  वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मामा चौक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यासह आजूबाजूच्या अकरा जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून भव्य स्वरूपाची तयारी करण्यात येत असून, सर्व नियोजनासाठी २५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समिती प्रमुख व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी वेळेत व परिपूर्ण नियोजनासह पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.  राहुल कर्डिले यांनी दिल्या.

कार्यक्रम नियोजनासाठी गठीत समित्या पुढीलप्रमाणे :

जागरण व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन समिती, सुरक्षा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवक व्यवस्थापन समिती, अतिथी स्वागत समिती, लंगर/भोजन व्यवस्थापन समिती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, वैद्यकीय सेवा समिती, विद्युत व ध्वनी व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी व मीडिया समिती, कार्यक्रम सादरीकरण समिती, ध्वज व सजावट समिती, आर्थिक व्यवस्थापन समिती, शासकीय परवानगी समिती, जुताघर व्यवस्थापन समिती, जलपुरवठा समिती, महिला सेवा समिती, ज्येष्ठ नागरिक समिती, जिल्हा समन्वय समिती, स्वरूपा व्यवस्थापन समिती, सुरक्षा व तपासणी समिती, निवास व्यवस्थापन समिती, प्रदर्शनी समिती व राखीव समिती.

या समित्यांमध्ये शासकीय अधिकारी, गुरुद्वारा प्रशासनातील प्रतिनिधी तसेच विविध समाजातील अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून, सर्वांच्या सहकार्याने “हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रम संस्मरणीय ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!