उस्मानगर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील वाळू तस्करीविरोधात आता केवळ गुन्हे दाखल न करता स्थानबद्धतेसारखी कठोर कार्यवाही केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला असून, उस्माननगर पोलिसांनी तो प्रत्यक्षात उतरवून दाखवला आहे.
वाळू तस्करीसारख्या संघटित, पर्यावरणविरोधी आणि शासनाच्या महसुलावर घाला घालणाऱ्या गुन्ह्यांवर एमपीडीए कायद्याचा वापर करत एका टिप्पर चालकास थेट एक वर्षासाठी हरसुल कारागृहात डांबण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.
उस्माननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहेत. वाळू तस्करीमुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असून, नदीपात्रात अपरिवर्तनीय बदल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तसेच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
पोलीस उपाधीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधक सेलचे सहायक पोलीस निरीक्षक नरसिंह आनंलदास, उस्माननगरचे सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस उप निरीक्षक गजानन गाडेकर, पोलीस अंमलदार अशोककुमार हंबर्डे, विश्वनाथ बोरकर, गंगाधर चिंचोरे, प्रकाश पेतेवार, तुकाराम जुन्ने आणि साईनाथ मोरे यांनी
मुरलीधर प्रकाश ढगे (वय २८, टिप्पर चालक, रा. येळी, ता. लोहा, जि. नांदेड) याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.
हा प्रस्ताव ३१ डिसेंबर २०२५ रोजी मंजूर झाला. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारी २०२६ रोजी, उस्माननगर पोलिसांनी मुरलीधर ढगे याला ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी हरसुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे सुरक्षितरित्या हलवले.
ही कारवाई म्हणजे वाळू तस्करांसाठी स्पष्ट इशारा असून, आता बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांना जामिनावर सुटका नाही तर थेट तुरुंगवास भोगावा लागणार आहे, असा कडक संदेश प्रशासनाने दिला आहे.
