वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले;ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदार एक किलोमीटर धावले
a leading NEWS portal of Maharahstra
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाकडून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यासाठी प्रत्येक गावातील नाल्यातून वाळू देणे सुरू करण्यात आले असून पैनगंगा नदी पात्रातील पाच घाटांचा लिलाव झाला तोही थोड्या दिवसात सुरू होणार असतानाही वाळू तस्कर रात्रीला अंधाराचा फायदा घेऊन वाळु चोरी करण्याचा प्रयत्न करत असून वसराम नाईक तांडा शिवारातील दोन ट्रॅक्टर धारक नदीपात्रातून वाळू आणत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क एक किलोमीटर धावत जाऊन ट्रॅक्टर पकडण्याची घटना दि 2 रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे.
पैनगंगा नदी पात्रात जाण्यासाठी अनेक गाव खेड्यातून बैलगाडी चालण्या लायक रस्ते असून या रस्त्यावरून रात्री काही लालची वृत्तीचे ट्रॅक्टर चालक वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांना फटका बसला तरीही अक्कल ठिकाणावर आलेली नसल्याने माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वसराम नाईक तांडा ते पैंनगंगा नदी पात्र दरम्यान रस्त्यावर विना नंबरचे दोन ट्रॅक्टर नदीपात्रातून ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून आणत असल्याची माहिती मिळाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी सिंदखेडचे सपोनी रमेश जाधवर यांना दूरध्वनी वरून कल्पना देऊन मंडळ अधिकारी तलाठी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे या रस्त्यावर अचानक पने गेले असता अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यात पाणी सोडून दिले. तर अरुंद रस्ता असल्याने तहसीलचे वाहन मुख्य रस्त्यावर थांबवावे लागले परंतु तहसीलदारांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रॅक्टरला पकडण्यासाठी चक्क एक किलोमीटर पर्यंत धावत जाऊन दोन्ही ट्रॅक्टरला पकडून तहसील कार्यालयात आणून जमा केले.
या धाडसी कारवाईत तहसीलदार अभिजीत जगताप यांचेसह सपोणी रमेश जाधवर ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे, मनोहर शेळके, सी पी बाबर, सुनील वनवे, दयानंद एरडलावार, अभिजीत कुडमेते, महसूल सेवक सागर हिवाळे, पवन पाटील, विवेक नागपुरे, चालक विलास शेडमाके यांचे सह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.