अशोकराव साहेब इंदोर सारखी स्मार्ट सिटी करू नका नांदेड फक्त नागरीकांना सुखाने जगण्याची सोय करा

रामप्रसाद खंडेलवाल
नांदेड-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणुक आता मार्गी लागली आहे. सर्वांचे लक्ष माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आहे. जवळपास 20 वर्ष महानगरपालिकेची सत्ता अशोक चव्हाण यांच्याच हातात होती आणि आता ते म्हणत आहेत. मला नांदेड शहर औद्योगिक हब करायचे आहे, शैक्षणिक हब करायचे आहे. एवढेच नव्हे तर काल-परवाच ज्या इंदोरमध्ये दुषीत पाणी पुरवठ्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्या इंदोर शहरासारखे शहर नांदेडला बनवायचे आहे. 20 वर्ष महानगरपालिकेची सत्ता आपल्याच हातात होती साहेब. आपण दोन वेळा मुख्यमंत्री होतात. मग हे नांदेड शहर त्यावेळी का इंदोर बनले नाही ? याचे काय उत्तर. आपल्या एमबीए शिक्षणावर आम्हाला सुध्दा मोठा गर्व आहे आणि मॅनेजमेंट आपल्यासारखे कोणी करू शकत नाही हे आम्हाला कॉलेज पासून माहित आहे. पण आपण ज्या भुलथापा ज्या भाषणा देत होतात त्या ऐकून अनेक वाक्यांवर आम्हाला हसु आवरले नाही. आम्ही प्रत्यक्षात तर आलो नव्हतो पण आता सर्वत्र लाईव्ह युग आहे. त्यानुसार आम्ही सुध्दा आमच्याच कार्यालयात बसून आपले भाषण ऐकले. सन 2008 पासून आजपर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपये नांदेड शहरावर खर्च आले आहेत. म्हणजे मागेच कधी तरी नांदेड शहर हे इंदोरच्या बरोबरीचे व्हायला हवे होते आणि आता आपण पुढच्या पाच वर्षात करणार असे म्हणतात काय लिहावे हेच कळत नाही. भुल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभुल केल्याशिवाय राजकारण होत नाही हे यालाच म्हणावे काय?

विकासाच्या नुसत्या गप्पा..1998 पासून सत्ता आपल्या ताब्यात आहे साहेब, पाणी, ड्रेनेज, रस्ते, नाल्या यांचे प्रश्न आजही कायम
1997 मध्ये नांदेड महानगरपालिका तयार झाली. ज्यावेळी फक्त 3 लाख मतदार होते. त्यावेळी एक प्रभाग आणि एक व्यक्ती अशी ती निवडणुक होती. पहिले महापौर सुधाकर पांढरे झाले. त्यानंतर 13 महापौर आपलेच आहेत. 14 वा ही आपलाच यावा ही आमची सुध्दा इच्छा आहे. पण काही प्रश्न डोक्यातून जात नाहीत. यंदाच्या निवडणुकीमध्ये आपण चैतन्य बापू देशमुख, मोहनसिंह तौर, दुष्यंत सोनाळे, भानुसिंह रावत, नागनाथ गड्डम, दिलीपसिंघ सोडी, महादेवी मठपती या कार्यकर्त्यांची तिकिटे कापली. निर्णय आपलाच कारण मुख्यमंत्र्यांचा कॉल आल्यावर सुदा चैतन्य बापूचे तिकिट कापले जाते. याही पेक्षा आम्हाला याचेही हसू आले की, चैतन्य बापू आपल्या कार्यकर्त्यांसमोर मुलाखत देत होते. एकूण 81 उमेदवारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुळ कार्यकर्ते किती आहेत. याचा शोध घेत आम्ही बराच वेळ लावला. पण आम्हाला ती संख्या काही 15 च्या वर गेलयाचे जाणवले नाही. अहो दोन दिवसांपुर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश आणि तिसऱ्या दिवशी त्यांना तिकिट त्यात काही जणांना तर पती-पत्नी दोघांना तिकिट, एका पिता-पुत्राला तिकिट असो आम्ही यात काय करू शकतो. आम्हाला असे वाटते की, आपल्या कानाखालच्याच लोकांना आपण तिकिटे दिली आहेत. त्यात भानुसिंह रावत सांगतात की, आपण 50 लाख रुपयांना तिकिटे दिली आहेत.

2008 पासून आजपर्यंत 6 हजार कोटी रुपये खर्च झालेला आहे साहेब
माननिय अशोकरावजी अमृत वन योजनेसाठी 150 कोटीचा एक टप्पा आणि 350 कोटीचा एक टप्पा असे दोन टप्यामध्ये एकूण फक्त 500 कोटी रुपये मल्लनिसारणसाठी आले आहेत आणि ते समाप्त पण झाले आहेत. तरीपण आजही मल्लनिसारणाची अवस्था किती उत्कृष्ट आहे हे लिहुन आम्ही तरी कशाला वेळ घालवावा. जेएनआरयुएम, अमृत 2, गोदावरी नदी स्वच्छता योजना अंतर्गत रस्ते, उड्डाणपुल अशा अनेक योजनांमधून पैसे आले. संपले पण आणि आपण सांगता विमान मी आणले. अहो ते विमानतळ आपणच बनविला आहे हे आम्ही विसरलो नाहीत आणि जनताही विसरणार नाही. पण आज आपण एका विमानाच्या सेवेबद्दल आपण बोलता हे ऐकतांना खुप वाईट वाटत होते. 6 हजार कोटी रुपये या शहरावर 17 वर्षात खर्च झाले आहेत. त्याचा हिशोब एकदा सांगा ना साहेब आणि त्या खर्चामधून नांदेडच्या कॉमन मॅनला काय मिळाले? आणि कॉमन मॅनला हवे तरी काय असते.फक्त रस्त्ते, पिण्याचे पाणी आणि रात्री गल्लीतून फिरतांना दिवाबत्ती यापेक्षा त्याच्या मोठ्या अपेक्षा नसतात. तरीपण 1999 ते 2025 मध्ये तीन दिवसा आड एकदा पाणी येत आहे. तरी पण पाण्याचा कर पुर्ण घेतला जातो. नांदेडची महानगरपालिका ड दर्जाची असतांना महानगरपालिका कर मात्र अ दर्जाची महानगरपालिका आहे अशा प्रकारे घेतला जात आहे. ही लुट कोणामुळे घडली. कोणाची जबाबदारी होती ही लुट थांबवण्याची याची उत्तरे पण द्या साहेब. शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण सभागृहाच्या नुतनीकरणासाठी 14 कोटी रुपये खर्च झाला. 11 कोटी रुपयांमध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची इमारत तयार झाली आहे. याचे उत्तर पण तुम्हालाच द्यावे लागणार ना साहेब.
काही खाजगी व्यवसायीक काही इमारती तयार करीत असतांना त्या इमारतीच्या कामामध्ये काय-काय घोडे अडवले त्याचे उत्तर कोण देईल. आज त्या इमारती उभ्या आहेत मात्र त्या मागचा खेळ लिहिला तर आम्ही मानहाणीचे पात्र ठरू. किंबहुना आम्ही तर देशद्रोही ठरविले जाऊ. पहा साहेब प्रश्न उपस्थित करणे हे कामच आहे आणि प्रश्न आपल्याला नाही तर त्या उमेदवारांना विचारायचे काय ? ज्यांना आपण तिकिटे वाटली आहेत. मागे 13 नगर पालिका निवडणुका जिल्ह्यात झाल्या. त्यामध्ये तीन ठिकाणीच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निवडूण आले आहेत. आपण आणि डॉ.अजित गोपछडे या दोन राज्यसभा खासदारांवर पक्षाने जबाबदारी दिली होती.मग त्यात मराठवाडा जनहित पार्टी कशी आली, कोणी आणली आणि का आणली याचे उत्तर कोण देईल. बिलोलीचा नगराध्यक्ष मराठवाडा जनहित पार्टीचाच निवडूण आला. त्यांची भेट आपण मुख्यमंत्र्यांसोबत घडविली आणि हे आपलेच आहेत असे सांगितले. 2012 मध्ये एमआयएम हा राजकीय पक्ष तेलंगणातून महाराष्ट्रात कोणी आणला. त्यातील बहुतांश नगरसेवक नंतर कॉंगे्रसमध्ये सहभागी झाले होते. काल पर्यंत आपणच वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पार्टीची बी टिम म्हणत होत्या आणि आज हेच बोलणार काय? अशी अनंत प्रश्न आहेत. ज्यांची उत्तरे आपल्यालाच द्यायला पाहिजे अशोकरावजी.वंशपरंपरेने कॉंगे्रस आपल्याला मिळाली. कॉंगे्रसने भरपूर काही दिले तरी आपण भारतीय जनता पार्टीत आलात. त्यावेळी सुध्दा आम्ही अशोकरावजी  जजाक अल्लाह खैर  या मथळ्याखाली वृत्त लिहिले होते पण त्या वृत्तामुळे थोडीच आपण कॉंगे्रसमध्ये येणार होतात आणि आला पण नाहीत. आपण-आपल्या मुलीला आमदार बनविले. आमची याला तर बिलकुल काही हरकत नाही. कारण नेत्यांचे मुल नेतेच बनतील ना! जाऊ द्या ते भोकर विधानसभेचा प्रश्न आहे. नाही तर उगीचच महानगरपालिकेचे प्रश्न उपस्थितीत करतांना घालमेल होईल. परंतू एकंदरीत आपण राजकीय कार्यकर्त्यांचा बळी घेतला हे मात्र नक्कीच साहेब. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या वाटले तर काही प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर मांडा तर छान होईल.

आपण एका मुलाखतीत नांदेडला इंदोर करणार म्हणालात साहेब. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जून 2014 मध्ये देशात 100 स्मार्ट सिटीची घोषणा केली होती. शहरी विकास मंत्री हरदीपसिंघ पुरी यांनी जून 2025 मध्ये 100 स्मार्ट सिटी तयार झाल्या असे सांगितले त्यातीलच एक इंदोर आहे. त्या स्मार्ट सिटीसाठी 10 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत आणि त्यातीलच इंदोरमध्ये दुषीत पाणी पुरवठ्यामुळे अनेकांचा मृत्यू होवून अजून 100 तास सुध्दा उलटले नाहीत. तशी स्मार्ट सिटी तयार करता काय? साहेब तशी स्मार्ट सिटी नको आम्हाला. फक्त सुखाने जगू द्या. आपण महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण संकल्पनामा जाहीर केला. त्यामध्ये महाराष्ट्राचे दैवत कुलभूषण छत्रपती शिवाजी राजांचे छायाचित्र नाही. तसेच भारताला संविधान देणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुध्दा नाही. हा प्रश्न आम्ही विचारायचा काय असा प्रश्नच आम्हाला पडला होता. तरी तो आम्ही मांडला आहे.
पतंग कोणाची
पत्रकार विजय जोशी यांनी आम्हाला एक व्हिडीओ पाठविला ज्यामध्ये आपण पतंग उडवितांनाची रिल आहे आणि त्यात गाणे लागले आहे चली चली रे पतंग मेरी चली रे..तर आम्ही विजय जोशी यांना विचारले की, संक्राती पर्वाचा वेळ आहे त्यामुळे बहुतेक अशोकरावजी पतंग उडवित असतील. पण जोशीसारखी बुध्दी आमची नाही म्हणून त्यांनी आम्हाला समजून सांगितले की, पतंग ही कोणत्या राजकीय पक्षाची निशाणी आहे. तेंव्हा कोठे आमची ट्युबलाईट जळली की, ही पतंग निशाणी एमआयएम पक्षाची आहे. जोशींना काय सांगायचे आहे. एवढी बुध्दी तर आमचीही तल्लख नाही पहा जोशींना सुध्दा एखादे उत्तर नक्कीच द्या.
संबंधीत व्हिडीओ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!