लोहा (प्रतिनिधी)-लोहा शहरात पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ डिसेंबर रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली असून, याबाबत ३० डिसेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
व्यवसायाने मजुरी करणारे इरबा रामचंद्र पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ डिसेंबर रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत, लोहा येथे मारुती व्यंकटी शेळके, बालाजी व्यंकटी शेळके, बापूराव व्यंकटेश शेळके व राजू दशरथ शेळके या चौघांनी संगनमताने त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, हात मुरगाळला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९९/२०२५ अन्वये संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
