मुख्याध्यापकाकडे स्वहस्ताक्षरात लिहून दिले प्रतिज्ञापत्र; सर्व शाळांनी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
नांदेड – देशभरात बालविवाह विरोधातील कायद्यानुसार विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यानंतरही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः ग्रामीण भागात पालक आपल्या अल्पवयीन मुलामुलींचे विवाह करून देत असल्याचेही उघडकीस आले आहे. राज्यासह जिल्ह्यातही अल्पवयीन मुलामुलींच्या विवाहाची प्रकरणे पुढे येत आहेत. त्यात मुलींचीच संख्या जास्त असल्याने चिंतेची बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय वयापासूनच बालविवाहाविरोधात मत बनविणे आणि पालकांमध्ये जागृती करण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. या उद्देशाने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आणि शिक्षकांनी अनोखी शक्कल लढवित नववर्षानिमित्त शाळेत शिकणाऱ्या मुलींकडून व त्यांच्या पालकांकडून मुलींचे १८ वर्षे आणि मुलांचे २१ वर्षे वयापर्यंत बालविवाह न करण्याचे चक्क प्रतिज्ञापत्रच भरुन घेतले आहे. नववर्षानिमित्त मुलामुलींनी हा संकल्प केला आहे.
जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जनजागृतीवर भर देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून बालविवाह निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात बालविवाह होवू नये यासाठी महिला बाल विकास विभाग, युनिसेफ एसबीसीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावू नयेत ते केल्यास काय शिक्षा होवू शकते, हे सर्वांना माहिती पाहिजे. यासाठी कायदयाची जनजागृती व प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत. या अंतर्गत शाळेतील मुलांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय वयातच बालविवाहाविरोधी योग्य संस्कार होण्यासाठी शाळेतील मुलामुलींकडून व त्यांच्या पालकांकडून दोन टप्प्यांत बालविवाह विरोधात प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे.
काय लिहिले आहे प्रतिज्ञापत्रात?
अल्पवयीन मुलामुलींनी लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मी माझे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण करीन. कोणाच्याही सांगण्यावरून, दबावापोटी अथवा कोणत्याही आमिषाला बळी पडून माझ्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी मी माझ्या विवाहास संमती देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत माझा बालविवाह होणार नाही, याची पूर्णपणे जबाबदारी घेईल असे म्हटले आहे. या मुलींच्या पालकांनीही अशाच आशयाचे प्रतिज्ञापत्र स्वाक्षरीनिशी लिहून शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिले आहे.
