लोकशाही धोक्यात? न्यूयॉर्क टाइम्सचा भारतावरील थेट आरोप
अमेरिकेतील आणि जगभरात प्रभाव असलेल्या न्यूयॉर्क टाइम्स या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने भारतातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत एक सविस्तर आणि संशोधनाधारित बातमी प्रसिद्ध केली आहे. या वृत्तानुसार, भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीच्या आडोशाखाली देशातील विविध यंत्रणांवर दीर्घकाळात मजबूत पकड निर्माण करण्यात आली असून, ती पकड आता सैल करणे अत्यंत कठीण झाले आहे.जरी हे वृत्त अमेरिकेत प्रसिद्ध झाले असले, तरी न्यूयॉर्क टाइम्सचे जागतिक वाचकवर्ग असल्यामुळे या बातमीची चर्चा भारतासह युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्वेतही होत आहे. या वृत्ताचे काही भाग भारतातून, विशेषतः नागपूर येथून संकलित करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रक्रियेमधून “धर्मनिरपेक्ष भारत” या संकल्पनेऐवजी “हिंदू-प्रथम राष्ट्र” अशी नवी राजकीय मांडणी आकार घेत असल्याचे चित्र मांडले आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले गेले आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख आणि त्याच्या कार्याची दखल घेतल्याचेही या बातमीत नमूद आहे.न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, आरएसएसने शासन, प्रशासकीय अधिकारी, शासकीय कार्यालये तसेच प्रसारमाध्यमांमध्ये आपला प्रभाव मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित केला आहे. संघाशी जवळीक असलेल्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर पोहोचवले जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सैन्यदल आणि पोलीस यंत्रणांवरही या प्रभावाचे पडसाद दिसत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

या बातमीत भारतातील सुमारे २० कोटींहून अधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांच्या स्थितीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. अल्पसंख्याक समुदायांवरील वाढते हिंसाचार, भेदभाव आणि त्रासदायक घटनांचा उल्लेख करत, सध्याची परिस्थिती त्यांच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.आरएसएस ही भारतीय जनता पार्टीची दीर्घकालीन “बॅकअप व्यवस्था” असल्याचेही या संशोधनात्मक अहवालात नमूद आहे. जगभरात अडीच हजारांहून अधिक संलग्न संस्था असलेल्या आरएसएसचे दिल्लीतील १३ मजली मुख्यालयही या ताकदीचे प्रतीक म्हणून उल्लेखले गेले आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे देशातील सर्वात प्रभावी व्यक्तींमध्ये गणले जात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यांना शासकीय तसेच इतर माध्यमांमध्ये विशेष महत्त्व दिले जाते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकारणाचाही या बातमीत उल्लेख आहे. “बुलडोझर बाबा” म्हणून ओळखले जाणारे योगी आदित्यनाथ हे धर्माच्या नावावर कठोर कारवाई करणारे नेते म्हणून मांडले गेले असून, भविष्यात नरेंद्र मोदी यांचा संभाव्य राजकीय पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.या अहवालानुसार, सत्तेची संपूर्ण यंत्रणा अशा प्रकारे उभी करण्यात आली आहे की, जरी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून हटले, तरीही सध्याचीच सत्ता-रचना आणि विचारसरणी कायम राहील. निवडणूक प्रक्रियेतील अडचणी, विरोधी पक्षांची घटती ताकद आणि “हिंदू-प्रथम राष्ट्र” ही संकल्पना अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न यांचाही उल्लेख या वृत्तात आहे.

लेखक संजय झा यांच्या मते, न्यूयॉर्क टाइम्सने जगाला हे दाखवून दिले आहे की भारत वेगाने धर्मनिरपेक्षतेपासून दूर जाऊन एका विशिष्ट धार्मिक संघटनेच्या प्रभावाखाली जात आहे. या बातमीचा परिणाम भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः विदेशी गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनावरही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, असे ते सांगतात.या लेखात भारतात पूर्वी घडलेल्या काही गंभीर घटनांची तुलना आजच्या परिस्थितीशी करण्यात आली असून, सध्या अशा घटनांना अपेक्षित तेवढे महत्त्व दिले जात नसल्याचे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पातळीपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत विविध यंत्रणांवर संघाचा प्रभाव वाढत असल्याचा दावा करत, ही परिस्थिती भारतीय लोकशाहीसाठी घातक ठरू शकते, असेही या अहवालात नमूद आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्ष आणि लोकशाहीवादी शक्ती अजूनही या प्रवाहाविरुद्ध संघर्ष करत असल्याचे चित्र मांडण्यात आले आहे. भारत वेगाने बदलत असून हा बदल अत्यंत जलद आणि खोलवर परिणाम करणारा आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या या चर्चित बातमीतून अधोरेखित करण्यात आले आहे.
