भारताच्या सीमा रक्षणासाठी जीव ओतणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील एका जवानाची दोन मुले शिक्षणासाठी देहरादूनला येतात… आणि त्यातील एक मुलगा “तू भारतीय नाहीस” या विकृत समजुतीमुळे मारला जातो. किती सडलेली मानसिकता आहे ही!
देहरादूनमध्ये झालेल्या या अमानुष मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला. कारण काय? तो नॉर्थ ईस्टमधला होता. दिसायला “चायनीज” वाटत होता.
आणि काही अडाणी, अफवांनी भरलेल्या मेंदूच्या टोळक्याने त्याला “चिनी, चिंकी, मोमोज” म्हणत आपला देशभक्तीचा बुरखा उतरवला. तो युवक ओरडून सांगत होता “आम्ही भारतीय आहोत”. पण जमाव बहिरा होता… आणि माणुसकी आंधळी.

हे दोघे भाऊ देहरादूनमध्ये शिकत होते. रोजच्या वापराच्या वस्तू घ्यायला बाहेर पडले… आणि वाट्याला मृत्यू आला. एकाचा गळा मोडला गेला, चाकूचे वार झाले. दुसरा अजूनही मृत्यूशी झुंजतो आहे.आणि पोलिस? पोलिसांनीही डोळ्यांवर “वर्णद्वेषी चष्मा” चढवलेला दिसतो.
पहिल्यांदा तक्रार घ्यायलाच टाळाटाळ. तक्रार घेतली तरी किरकोळ कलमे.
गळ्यात गंभीर जखम असलेल्या युवकासाठी “साधी हाणामारी” अशी नोंद.
जणू कुणी रस्त्यात धक्का दिला होता!
सीमेवर देशासाठी लढणाऱ्या जवानाचा आवाजही या व्यवस्थेला ऐकू गेला नाही. दुसऱ्या दिवशीसुद्धा एफआयआर नीट नोंदवली गेली नाही.
खून दाखल करायला तब्बल 23 डिसेंबर उजाडला तोपर्यंत युवक कोमात होता, बेशुद्ध होता… पण व्यवस्था मात्र “शुद्धीत” नव्हती.

पाच जण होते म्हणे, सहावा नंतर जोडला गेला. मुख्य आरोपी नेपाळला पळून गेला हे आधी का दिसलं नाही? सहा जणांनी मारहाण केली, पण कट नव्हता?
मुलगा मेला, तेव्हा अचानक गुन्हा गंभीर झाला? नॉर्थ ईस्टच्या लोकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवल्यावरच पोलिसांची झोप उडाली.तोपर्यंत हा “वर्णद्वेषी हल्ला” नव्हे, तर “आपसातील भांडण” होता!
हा प्रकार केवळ एका कुटुंबावर झालेला हल्ला नाही.
हा आपल्या समाजाच्या सडलेल्या मानसिकतेचा आरसा आहे. व्हॉट्सॲप विद्यापीठातून शिकवलेला द्वेष आहे.आपणच आपल्या देशातील सात बहिणींना परके ठरवतो… आणि मग राष्ट्रवादाच्या गप्पा मारतो.
नागालँड, आसाम, मणिपूरमध्ये काही घडलं की लगेच “गद्दार” ठपका.
दक्षिण भारतात द्रविड वेगळे. उत्तर भारतात आर्य वेगळे. चेहरे वेगळे म्हणजे देश वेगळा, असा कोणता संविधानात नियम आहे?
2014 मध्ये दिल्लीमध्ये अरुणाचल प्रदेशच्या तरुणीची हत्या झाली — “चिनी” म्हणून.बेंगळुरूमध्ये नॉर्थ ईस्टच्या लोकांना घर सोडून पळावं लागलं.
मेरी कोमसारख्या भारताला गौरव देणाऱ्या खेळाडीलाही “तू भारतीय दिसत नाहीस” असं ऐकावं लागतं.

मग प्रश्न साधा आहे,नॉर्थ ईस्टमधील नागरिकांनी भारतीय असल्याचं प्रमाणपत्र घ्यायचं कुठून? जिवंत राहण्यासाठी स्वतःचा जीव द्यावा लागेल का?आपण परदेशात भारतीयांवर होणाऱ्या अन्यायावर ओरडतो.पण आपल्या घरात होणाऱ्या या हिंसेवर गप्प का? ही हेट क्राईम आहे. पण ती “हाणामारी” म्हणून लपवली जाते.कारण संवेदनशीलता, माणुसकी आणि जबाबदारी हे तिन्ही या सिस्टीममधून बेपत्ता झाले आहेत.
नागरिक हे देशाचे मालक असतात.
आणि मालक म्हणून आम्ही ही व्यथा मालकांसमोर मांडतो आहोत.
कारण आज गप्प बसलो, तर उद्या “तू भारतीय नाहीस” हे वाक्य कुणाच्याही मानेवर चाकू होऊ शकतं.
