रेती, मुरुम, मातीची वाहतूक विना नंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई
नांदेड-जिल्ह्यातील बेकायदेशीर विना नंबर अवजड वाहनांवर जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नांदेड शहरात अचानक धडक कारवाई करत ११ विना नंबर हायवा पकडल्या. लातूर रोडवरील लक्ष्मी पेट्रोल पंप, विष्णुपुरी परिसरात अवैध वाहतुकीच्या उद्देशाने उभ्या असलेल्या अकरा विना क्रमांकाच्या हायवा त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले.
वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, शासनाचा महसूल बुडविणे तसेच अपघातांना आमंत्रण देणाऱ्या विना नंबर वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पकडण्यात आलेल्या सर्व विना क्रमांकाच्या हायवा पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या पथकाकडे तात्काळ सुपूर्द करण्यात आल्या.
आरटीओ कार्यालयामार्फत या वाहनांवर नियमानुसार एकूण ७३ हजार ७५० रुपयांचा दंड आकारून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात यापुढेही रेती, मुरुम, माती आदींची वाहतूक विना नंबर, अपूर्ण कागदपत्रे किंवा नियमबाह्य पद्धतीने करणाऱ्या हायवा व इतर अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. “वाहन चालक व मालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
पकडण्यात आलेल्या हायवा वाहनांचे क्रमांक पुढीलप्रमाणे :
एमएच 46 बीबी 9546,
एमएच 26 सीएच 2721,
एमएच 26 सीटी 7779,
एमएच 26 सीएम 7779,
एमएच 26 सीएच 4909,
एमएच 21 बीएच 0804,
एमएच 26 सीएच 7565,
एमएच 29 बीई 4869,
एमएच 26 सीएच 2909,
एमएच 14 एलएक्स 4892,
एमएच 26 सीएच 2429.
