सकाळची वेळ होती. दुकान उघडून नेहमीप्रमाणे देवासमोर अगरबत्ती लावत होतो. त्या शांत क्षणात अचानक साधारण पंचवीस ते तीस वर्षांचा एक तरुण माझ्याजवळ आला. त्याने अत्यंत संयत स्वरात पाच रुपयांची विनंती केली. पण मी देवपूजेत आहे हे लक्षात येताच तो थांबला आणि आश्चर्यकारकरीत्या म्हणाला
“सेठजी, भवनी झाली नाही… मी नंतर येतो.”
हे शब्द ऐकून मी काही क्षण स्तब्ध झालो. आजच्या धावपळीच्या जगात, ज्याला स्वतःच्या पोटाची काळजी आहे, तो तरुण देवपूजेला आदर देतो—हे दृश्य मनाला चटका लावून गेले. मी त्याला थांबवले आणि दहा रुपये देऊ केले. पण त्याने नकार देत म्हटले, “मला फक्त पाच रुपयेच द्या.”कारण विचारले असता तो म्हणाला, “ताप आला आहे… औषध घ्यायचे आहे.”
हा तरुण पहिल्यांदाच दिसलेला नाही. जुना मोढा ते वजीराबाद या परिसरात तो नेहमी फिरताना दिसतो. कधी अत्यंत स्वच्छ कपडे, नीटनेटका पँट-शर्ट, डोक्याचे केस व्यवस्थित कापलेले, शांत चालणारा तर कधी अचानक सर्व कपडे काढून फक्त चड्डीवर रस्त्यावर पडलेले कागद उचलत, त्यांचे तुकडे करत काहीतरी पुटपुटत जोरात चालत सुटलेला दिसतो. कधी मोढ्याकडे, कधी वजीराबादकडे.
आणखी धक्कादायक बाब म्हणजे काही वेळानंतर तो पुन्हा शांत होतो. नीट कपडे घालतो, चेहऱ्यावर कुठलाही आक्रोश नाही, आणि सभ्यपणे, हळूहळू इकडून तिकडे फिरत राहतो. कधी माझ्याजवळ येऊन दोन-पाच रुपयांची विनंती करतो—तीही नम्र शब्दांत.
एके दिवशी मी त्याच्याशी संवाद साधला.
“तू कोण आहेस? असे का करतोस?”
त्यावर त्याने सांगितले की तो जवळच्याच एका गावचा आहे (गावाचे नाव मात्र आठवत नाही). त्याचे उत्तर मात्र मन हेलावून टाकणारे होते
“मी जेव्हा असे कपडे काढून पळतो, तेव्हा माझ्या अंगात कोणी तरी नातेवाईक प्रवेश करतो. तेव्हा मला काहीच कळत नाही.”
त्याच्या या म्हणण्यात किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे. पण एक गोष्ट निर्विवाद आहे हा तरुण मानसिक आजाराने त्रस्त आहे. तो गुन्हेगार नाही, समाजविघातक नाही, तो भिकारीसुद्धा नाही; तो केवळ दुर्लक्ष, अज्ञान आणि व्यवस्थेच्या उदासीनतेचा बळी ठरलेला एक तरुण आहे.
आज आपल्या शहरात, आपल्या रस्त्यांवर असे अनेक चेहरे आहेत. आपण त्यांच्याकडे कधी कुतूहलाने पाहतो, कधी भीतीने दूर सरकतो, तर बहुतांश वेळा दुर्लक्ष करतो. पण प्रश्न असा आहे की
मानसिक आजार म्हणजे गुन्हा आहे का? की तो उपचाराचा विषय आहे?
स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी अशा व्यक्तींची ओळख करून त्यांना योग्य वैद्यकीय उपचार, समुपदेशन, निवारा आणि पुनर्वसन उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. कारण आज तो रस्त्यावर भरकटतो आहे; उद्या तो कोणाच्या तरी घरचा आधारस्तंभ असू शकतो किंवा आपल्यापैकी कुणाचाच माणूस.
“भवनी झाली नाही… मी नंतर येतो,” असे म्हणणारा तो तरुण आपल्याला एक प्रश्न विचारून जातो
आपली माणुसकी खरंच जिवंत आहे का?
की आपणही ‘नंतर पाहू’ म्हणत पुढे निघून जातो?
समाजाच्या संवेदनशीलतेवर विचार सर्वा समोर ठेवणारा एक सामान्य नागरिक
– राजेंद्र सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
7700063999
