नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली असून ही निवडणूक निश्चितपणे जिंकू, असा ठाम विश्वास काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.या युतीअंतर्गत एकूण 81 जागांपैकी 60 जागांवर काँग्रेस तर 20 जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या वेळी झालेल्या बैठकीस खासदार रवींद्र चव्हाण, माजी महापौर अब्दुल सत्तार, हनुमान पाटील बेटमोगरेकर, ॲड. अविनाश भोसीकर प्रशांत इंगोले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.माणिकराव ठाकरे म्हणाले की, नांदेड-वाघाळा महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात जाऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीकडून कट रचला जात आहे. काँग्रेसचे काही माजी नगरसेवक एमआयएम पक्षात पाठवून काँग्रेसचे मतदान विभाजित करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस सोडून एमआयएममध्ये गेलेल्या माजी नगरसेवकांना जनता त्यांची योग्य जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात असले तरी हा कट यशस्वी होणार नाही. वंचित बहुजन आघाडी सोबतची युती ही निवडणूक निश्चितपणे जिंकेल, असा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून कोणताही युती प्रस्ताव आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच अजित पवार गटासोबत काही ठिकाणी वेगळी लढत लावण्याचा कट भाजपकडून रचला जात असून, यामागे सेक्युलर मतांचे विभाजन करून विजय मिळवण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. मात्र आता जनतेने अजित पवार गटालाही ओळखले असून पारंपरिक मतदानाचे विभाजन होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, माजी महापौर अब्दुल सत्तार म्हणाले की, काँग्रेसचे जे 11 माजी नगरसेवक एमआयएममध्ये गेले आहेत, त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेस नगरसेवकांची अवस्था पाहिली आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपऐवजी एमआयएमची वाट धरली. मात्र त्यांनाही यश मिळणार नाही आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिका काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
