नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक;विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित   

नांदेड – राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश निर्गमीत केले आहेत.

निवडणूक कालावधीत विश्रामगृह वापरावरील निर्बंध

शासकीय व निवडणूकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त, इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस महानगरपालिका मतदार संघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय प्रवेश करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

ध्‍वनीक्षेपक, ध्‍वनिवर्धकाचा वापर

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सक्षम प्रधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्‍या वाहनांवर ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्‍ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक ध्‍वनीप्र 2009/प्र.क्र.12/08/ता.क.1, दिनांक 31 जुलै, 2013 नुसार ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर ध्‍वनि प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपुर्वी आणि रात्री. 10 वाजेनंतर करता येणार नाही.

कार्यालये, विश्रामगृहे परिसरातील निर्बंध

नांदेड वाघाळा महानगरपालिका कार्यक्षेत्राचे हद्दीपावतो, सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यालये, विश्रामगृहे इत्‍यादी परिसरात कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर निर्बंध राहतील.

शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध

निवडणूकीचे कालावधीत नांदेड वाघाळा महानगरपालिका मतदार संघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीपावेतो निवडणूक कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाव्‍दारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके,झेंडे लावणे इत्‍यादी बाबीस काही प्रतिबंध

फिरत्‍या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्‍या डाव्‍या बाजुला विंड स्‍क्रीन ग्‍लासच्‍या पुढे राहणार नाही आणि तो त्‍या वाहनाच्‍या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्‍त राहणार नाही. प्रचाराच्‍या फिरत्‍या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्‍या आसनामागे वाहनाच्‍या डाव्‍या व उजव्‍या बाजुनेच लावण्‍यात यावा. इतर कोणत्‍याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्‍या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्‍या वाहना व्‍यति‍रीक्‍त इतर कोणत्‍याही वाहनावर लावता येणार नाही.

सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालय स्‍थापन करण्यास निर्बंध

नांदेड वाघाळा महानगरपालिका मतदार संघ कार्यक्षेत्र पावेतो निवडणूकीचे कालावधीत धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे,चिन्‍हांचे कापडी फलके, भाषण देण्याबाबतचे निर्बंध

निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

शासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध

निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

शस्‍त्र परवानाधारकाकडील शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर बंदी

निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, बँक सुरक्षा गार्ड यांचे व्‍यतिरिक्‍त इतर सर्व परवाना धारकास परवान्‍यातील शस्‍त्रास्‍त्रे बाळगण्यास व वाहून नेण्‍यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे.वरील सर्व आदेश नांदेड जिल्ह्यातील नांदेड वाघाळा महानगरपालिका मतदारसंघ कार्यक्षेत्राच्या हद्दीपावेतो आदेश निर्गमीत झाल्‍याचा दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून 16 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहतील.

नामनिर्देशनपत्र दाखल करताना अवलंब करावयाची कार्यपद्धत

नांदेड जिल्ह्यात नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या 100 मी. च्या बाहेर वाहने व मिरवणूक थांबवावी. तसेच वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या/वाहनांना तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात उमेदवारासोबत तीन पेक्षा जास्त व्‍यक्‍तीनी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक‍ प्रचार करणेस प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.हा आदेश नांदेड जिल्‍हयाच्या नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या हद्दी पावेतो 23 डिसेंबर 2025 चे 6 वाजेपासून ते 3 जानेवारी 2026 चे मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!