उमरी नगरपरिषद निवडणूक ; आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी !  

आर्यवैश्यांनीच आपल्या समाज बांधवांशी दगाफटका केल्याची समाजातूनच होतेय ओरड

उमरी/नांदेड (प्रतिनिधी)-नुकत्याच पार पडलेल्या उमरी नगरपरिषद निवडणुकीत आर्य वैश्य समाजातील दोन उमेदवारांना आपल्या ‘भाऊबंदकी’चा फटका बसल्याने, दोन जागा गमवाव्या लागल्याची ओरड सध्या उमरी शहरात याच समाजातून होतेय. परिणामी सध्याच्या नगर परिषदेत आर्य वैश्य समाजाचा एकही व्यक्ती प्रतिनिधित्व करण्यासाठी पोहोचू शकलेला नाही.

उमरी नगर परिषदेचा जुन्या काळापासूनचा इतिहास पाहता नागनाथ तम्मेवार, विजयकुमार उत्तरवार, सुभाष उत्तरवार आदींनी वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदावर आपली मांड ठोकली होती. नागनाथ कोटगिरे यांनी वीस वर्ष, तर नरसिंग चीटमलवार आणि गणेश तम्मेवार यांनीही उपाध्यक्ष पद भूषवले. विशेष म्हणजे दीपालीताई मामीडवार यांनी पाच वेळा नगर परिषदेत प्रतिनिधित्व केले. तर सौ सरिता राम येरावार यांनीही अडीच वर्षासाठी अध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवले होते. हा इतिहास पाहता, या नगर परिषदेत प्रत्येकवेळी आर्य वैश्य समाजाच्या कोणत्या ना कोणत्यातरी लोक प्रतिनिधीने समाजाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
पण यंदा म्हणजेच 21 डिसेंबर 25 रोजी या नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत आर्य वैश्य समाजाच्या एकाही प्रतिनिधीस निर्वाचित होऊन सभागृह गाठता आलेले नाही.

उमरी शहरच नव्हे,तर तालुक्यातील कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत अधिकतर गोरठेकर गटाचेच प्राबल्य असते. यंदाही उमरीकरांनी तोच कित्ता गिरविला. पण या वेळेचे वैशिष्ट्य थोडे वेगळे ठरले. यावेळी नगर परिषदेत गोरठेकर गट फक्त एक जागा हरला,ती म्हणजे प्रभाग क्रमांक पाच (ब). या जागेवर गोरठेकर गटातर्फे सौ जयश्री अनिल नगनूरवार या उमेदवार होत्या. सौ जयश्री यांचे पती अनिल नगनूरवार हे या शहरातील तसेच आर्य वैश्य समाजातील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रथितयश नाव!कोणाच्याही अडीअडचणीत धावून जाण्यासाठी सदैव तत्पर असणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणून अनिल नगनूरवार यांची परिचितांमध्ये प्रतिमा आहे. असे असताना आणि त्या प्रभागांमध्ये आर्य वैश्य समाजाची अधिकतर मते असताना, मुख्य म्हणजे गोरठेकर गटाची उमेदवारी लाभलेल्या सौ जयश्री अनिल नगनूरवार यांचा केवळ 17 मतांनी पराभव व्हावा ही बाब समाजबांधवांच्या दृष्टीने लाजिरवाणी ठरली आहे. या प्रभागात भाजपातर्फे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या कन्या सौ सायली कुलकर्णी यांचा जो निसटता विजय झाला,त्यास आर्य वैश्य समाजातीलच काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी जाणीवपूर्वक हातभार लावल्याची चर्चा या समाजातील बांधव करीत आहेत.

दुसरीकडे प्रभाग सात ब मधून याच समाजाचे किशोर पबितवार (भाजपा उमेदवार) यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. आर्य वैश्य समाजातील या दोन्ही उमेदवारांच्या अनपेक्षितरित्या झालेल्या पराभवास समाज महासभेतील राजकारणाची किनार असल्याचेही स्पष्टपणे बोलले जाते. महासभेच्या जिल्हा कार्यकारिणीवर या तालुक्यातून तीन सदस्यांसाठी संधी देण्यात आली होती. या निवडीच्या वेळी आपापसातील हेव्या-दाव्यांमुळे उघड एकमत न झाल्याने,चिठ्ठी पद्धतीने प्रतिनिधींची नावे निश्चित करण्यात आली होती. यात काही तथाकथित स्वयंघोषित नेत्यांची वर्णी न लागल्याने, त्या गोष्टीचा वचपा काढण्यासाठी या असंतुष्ट मंडळींनी या दोन जागी दगा फटका करत, आमची माती “करणारी” आमची माणसं अशी भूमिका वठवली. पण त्यांच्या या आत्मघातकीवृत्तीने या वेळच्या नगर परिषदेतून संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व हद्दपार झाले.सामाजिक राजकारणात सातत्यपूर्ण प्राबल्य ठेवावयाचे असल्यास, सामाजिक अर्थात जातीय समीकरणे योग्य पद्धतीने हाताळणे फार महत्त्वाचे असते. म्हणूनच एकंदरीत परिस्थितीचा विचार करता, गोरठेकर श्रेष्ठींकडून सौ. जयश्री नगनूरवार, अनिल नगनूरवार किंवा अन्य एका समाज बांधवास निश्चितपणे स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करून सामाजिक समतोल राखला जाईल अशी आशा आर्य वैश्य समाजबांधव आणि त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!