काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एक जुना फोटो पोस्ट केला आणि देशातील “अर्थ लावणाऱ्या उद्योगाला” पुन्हा रोजगार मिळाला. फोटोत खुर्च्यांवर लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि इतर दिग्गज; तर जमिनीवर बसलेले नरेंद्र मोदी. दिग्विजय सिंह यांनी लिहिले “जमिनीवर बसणारा माणूस देशाचा पंतप्रधान बनतो, ही संघटनेची ताकद आहे.”
एवढे वाक्य पुरेसे ठरले. सत्य समजून घ्यायची गरजच उरली नाही. लगेच आरडाओरडा सुरू झाला “दिग्विजय सिंह यांनी आरएसएसची स्तुती केली!”
ज्यांनी आयुष्यभर आरएसएसवर टीका केली, ज्यांचे आरएसएसविरोधी मत दगडावर कोरल्यासारखे स्पष्ट आहे, तेच अचानक संघप्रेमी ठरवले गेले. कारण विचार समजून घेण्यापेक्षा हेडलाईन बनवणे सोपे असते.दगड टाकला गेला आणि वर्तुळे तयार झाली पण ती विचारांची नव्हे, तर गैरसमजांची. काही प्रसारमाध्यमांनी तर थेट ठरवूनच टाकले की दिग्विजय सिंह यांना आता “काय बोलायचं तेच कळत नाही.” गंमत म्हणजे कालपर्यंत “वय झालंय” म्हणून हिणवणारीच माध्यमे आज त्यांच्याच वाक्यांचे तुकडे करून चघळताना दिसली.

चर्चा वाढल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी पुन्हा स्पष्ट केले “मी आरएसएस किंवा नरेंद्र मोदी यांची कधीच प्रशंसा करू शकत नाही.”पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण एकदा कथा ठरली की सत्याला परवानगी लागत नाही. दिग्विजय सिंह हे काँग्रेसमध्ये असे नेते आहेत की त्यांनी तोंड उघडले, की लगेच कुणाला तरी वाटते “आता काँग्रेस संपली!” काल मणिशंकर अय्यर, आज दिग्विजय सिंह. फरक इतकाच एकाला जिभेमुळे टार्गेट केले, दुसऱ्याला मेंदूमुळे.सीडब्ल्यूसीच्या बैठकीत त्यांनी सांगितले की काँग्रेसमध्ये स्लीपर सेल आहेत. लगेच काहींच्या पोटात गोळा आला. कारण सत्य बोलणे हा आजच्या राजकारणात सर्वात मोठा अपराध आहे. त्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाची गरज सांगितली सत्ता एका हातात नको, अनेक हातात हवी. हे ऐकून ज्यांना दिल्लीच्या दरबारातच राजकारण संपते असे वाटते, त्यांना अस्वस्थ व्हायलाच हवे.
काही जण म्हणाले, दिग्विजय सिंह ‘शशी थरूर मोड’मध्ये गेले आहेत. तर काहींनी थेट डिप्रेशनचे सर्टिफिकेट वाटायला सुरुवात केली. कारण आपल्या मताशी न जुळणारा माणूस शहाणा असूच शकत नाही, हीच आजची समजूत आहे.दिग्विजय सिंह हे चमचेगिरीच्या राजकारणातले नेते नाहीत. फोटो, पोशाख, दरबार या गोष्टी त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाच्या नव्हत्या. साधा पोशाख, साधी भाषा आणि थेट विचार म्हणूनच कदाचित ते अनेकांना खुपतात. त्यांच्या पत्नी अमृता राय पत्रकार आहेत; त्यांनाच कधी कधी “जरा नीट कपडे घाला” असे सांगावे लागते. कारण हा नेता कधीही “नेत्यासारखा” दिसण्याच्या स्पर्धेत नव्हता.त्यांची वक्तव्ये ही उगाच नसतात. ती अनुभवातून, इतिहासातून आणि चिंतनातून आलेली असतात. आणि इतिहास सांगतो दिग्विजय सिंह जे आज बोलतात, ते काँग्रेस काही काळानंतर स्वीकारते. म्हणूनच ते फक्त नेते नाहीत, तर अनेकदा मार्गदर्शक ठरले आहेत.
त्यांनी भाजपच्या संघटनशक्तीचे उदाहरण दिले. लगेच आरडाओरडा “भाजपची स्तुती!” खरं तर हा काँग्रेसला दिलेला सणसणीत आरसा होता. भाजपचा कार्यकर्ता पदासाठी नाही, फोटोसाठी नाही, तर विचारासाठी काम करतो हे सांगणे म्हणजे भाजपप्रेम नाही, तर काँग्रेसवर टीका आहे. पण टीका सहन करण्याची सवय कुणाला राहिली आहे?आज काँग्रेस फ्रँचायझी सिस्टीमवर चालते तिकीट वाटप, सौदे, जिल्हे कंत्राटावर. पण रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता कुठे आहे? “आज मुख्यमंत्रीसोबत चहा प्यायलो” यावर पक्ष चालत नाही, हे दिग्विजय सिंह सांगतात आणि म्हणूनच ते अप्रिय ठरतात.
गोदी मीडियाने मात्र नेहमीची कथा तयार केली “हा हिंदुत्वविरोधी आहे, आरएसएसविरोधी आहे.” जणू त्यामुळे जनता लगेच त्यांच्यावर तुटून पडेल! पण सत्य असे आहे की विचारांशी जोडलेले कार्यकर्तेच पक्ष उभा करतात, नेत्यांना जोडलेले नव्हे.भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनाही हेच उमगले दिग्विजय सिंह वर्षानुवर्षे जे सांगत होते, तेच खरे आहे. गंमत म्हणजे, काल ज्यावर टीका होती, आज त्याच गोष्टींवर टाळ्या वाजवल्या जात आहेत. फरक फक्त वक्त्याचा.एकंदरीत काय? दिग्विजय सिंह यांनी फोटो पोस्ट करून मोदी किंवा भाजपची स्तुती केली नाही; त्यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.“जमिनीवर उतरा, संघटन मजबूत करा, नाहीतर इतिहासात केवळ आठवण उरेल.”आणि कदाचित म्हणूनच दिग्विजय सिंह अनेकांना आवडत नाहीत.कारण ते सत्य सांगतात आणि सत्य नेहमीच अस्वस्थ करते.
