नांदेड ता.२२ : बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंना टार्गेट करून हत्या, अपहरण, बलात्कार, मंदिरे उद्ध्वस्त करणे तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनांमुळे तेथील अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मानवी हक्कांवर गंभीर आघात झाला असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
बांगलादेश निर्मितीसाठी हिंदूंनी मोठे बलिदान दिले असताना, आज त्याच समुदायावर अमानवी अत्याचार होत आहेत. घरात राहिले तर उपासमारीची वेळ येते आणि बाहेर पडले तर मॉब लिंचिंगचा धोका निर्माण होतो, अशी भयावह परिस्थिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. अंतरिम सरकार स्थापनेनंतर कट्टरपंथीयांचे मनोबल वाढल्याने हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. अलीकडेच दिपुदास या हिंदू तरुणावर ईशनिंदेचा खोटा आरोप लावून नृशंस हत्या केल्याची घटना घडली असून, त्याचे व्हिडीओ प्रसारित करून अल्पसंख्याकांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे सांगत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील कट्टरपंथीयांच्या हिंसाचाराविरोधात तसेच तेथील सरकारच्या भूमिकेविरोधात बुधवारी (ता.२४) ११.३० वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविकुमार चटलावार यांनी केले आहे.
