माळेगाव यात्रेत उद्या लावणी महोत्सव; महिला आरोग्य शिबिराचे आयोजन

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- मीडिया सेंटर, दिनांक 21 डिसेंबर- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील विशेष आकर्षण ठरणारा लावणी महोत्सव  उद्या 22 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्साहात संपन्न होणार असून, त्यासोबतच महिला आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
     अकलूजच्या धर्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाची परंपरा जपली जात आहे. आज होणाऱ्या या लावणी महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर आमदार भीमराव केराम व आमदार बालाजीराव कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
     या लावणी महोत्सवात राज्यातील नामवंत कलावंताचे 8 लावणी संच सहभागी होणार असून, त्यांच्या बहारदार सादरीकरणामुळे यात्रेतील वातावरण रंगतदार होणार आहे.
लावणी महोत्सवात सहभागी आठ संच
अशा-रूपा परभणीकर, अंबिका- अनुराधा लखनगावकर, स्नेहा- शामल लखनगावकर, मंगल- माया खामगावकर, आशा- वैशाली नगरकर, पूनम कुडाळकर प्रस्तुत तुमच्यासाठी काय पण, अमर पुणेकर निर्मित नटखट सुंदरा आणि शाहीर मस्के आणि अनुराधा नांदेडकर हे आठ संच एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.
महिला आरोग्य शिबिराचे आयोजन
माळेगाव यात्रेनिमित्त आज  सकाळी 11 वाजता महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत थोरात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!