बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन
नांदेड- जिल्हाधिकारी कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नांदेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत – १०० दिवसांचे अभियान अंतर्गत आज शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील सर्व शासकीय कार्यालये तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.
बालविवाह समूळ उच्चाटन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, बालविवाहामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह प्रतिबंध ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शपथविधी कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कैलास तिडके तसेच सर्व शाखांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.तसेच याच अनुषंगाने नांदेड शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्येही बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.
