जगात कुठे तरी हल्ला झाला की लगेच सायरन वाजतात. पण एपस्टीन फाइल्स समोर आल्यावर मात्र जगभरातील सत्ताधीश, उद्योगपती आणि “नीतीमत्तेचे स्वयंघोषित रखवालदार” यांच्या डोक्यात घंटा वाजू लागल्या. या फाइल्समध्ये काय आहे? तर जगातील मोठमोठ्या नेत्यांची, अब्जाधीशांची आणि श्रीमंतांची छायाचित्रे. म्हणजे फोटोच आहेत पण असे फोटो, जे पाहिल्यावर प्रश्न उभा राहतो : हे खरंच फक्त फोटो आहेत का?
अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रॅट पक्षाच्या खासदारांनी ९० हजार छायाचित्रांपैकी केवळ ६५ छायाचित्रे सार्वजनिक केली. एवढ्यावरच जगभरात भूकंप झाला. मग उरलेली ८९,९३५ छायाचित्रे बाहेर आली तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी. त्यात बिल गेट्स एका महिलेसोबत दिसले आणि लगेचच स्पष्टीकरणांची रांग लागली“फोटो म्हणजे गुन्हा नसतो.” बरोबर आहे. पण फोटो काढण्याची जागा, वेळ आणि संगत यालाही अर्थ असतो, हे विसरू नये.
या फाइल्समध्ये गुगल बनवणारे सर्गेई ब्रिन, चित्रपटसृष्टीतील नावाजलेली मंडळी, तत्त्वज्ञ, तसेच डोनाल्ड ट्रम्पचे माजी सहाय्यक स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक चेहरे दिसत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रश्न असा नाही की फोटो कुणाचा आहे, तर प्रश्न असा आहे की हे सगळे लोक एकाच ठिकाणी, एकाच प्रकारच्या कथांमध्ये कसे दिसतात?
दरम्यान, महिलांच्या शरीरावर लिहिलेल्या वाक्यांचे फोटो, तपशीलवार माहिती असलेले स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत. माहिती लपवून फोटो प्रसिद्ध केले, असे सांगितले जाते. म्हणजे स्त्रियांची ओळख लपवायची, पण श्रीमंतांची प्रतिष्ठा जपायचीहे नवे धोरण वाटते. “एका मुलीसाठी हजार डॉलर्स” असा दर ठरवला जातो, आणि तरीही काही जण म्हणतात, “यात गैर काय?”

भारत मात्र या सगळ्या गोंधळाकडे नेहमीप्रमाणे नैतिकतेच्या दुर्बिणीतून पाहतो. इथे द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, तेव्हा महायुद्ध झाले. आज मात्र फोटो समोर आले तरी युद्ध होत नाही; उलट “स्पष्टीकरण” दिले जाते. काल-परवाच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी एका मुस्लिम महिलेचा हिजाब ओढला, तेव्हा देशभरात गदारोळ झाला. नंतर सांगण्यात आले “बॉम्ब आहे का ते पाहत होतो.” बॉम्ब असता तर मुख्यमंत्री काय करणार होते? स्वतः हातात घेणार होते की आधी पत्रकारांना बोलावणार होते?
भारताचे माजी पंतप्रधान देवगौडा यांच्या नातवंडांशी संबंधित महिलांबरोबरच्या व्हिडिओंची प्रकरणे समोर आली, तरी राजकीय प्रचार थांबला नाही. कारण इथे दोष मोठा नसतो, फक्त माणूस मोठा असतो. पैसा असेल, सत्ता असेल, तर नैतिकता ही ऐच्छिक बाब ठरते भारतामध्येही आणि जगातही.
एपस्टीनचा मृत्यू हा तर रहस्यावरचं महाभारत आहे. तुरुंगाच्या खोलीत ना हुक, ना पंखा पण आत्महत्या झाली, असे सांगितले जाते. प्रश्न विचारला तर उत्तर नाही; उत्तर मागितले तर कट-सिद्धांत. आणि तरीही आपण म्हणतो, “लोकशाही मजबूत आहे.”

अमेरिकन संसदेत विरोधी पक्षाने हा विषय उचलला, प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे सत्ताधाऱ्यांनाही कधीतरी आरसा दाखवला जाऊ शकतो, हे सिद्ध झाले. मात्र अजूनही प्रश्न राहतोच : मोठ्या पदांवरील काही नावे यात नसल्यामुळेच हा सगळा खेळ सुरू राहू दिला का?
दरम्यान, भारतात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एपस्टीन फाइल्सवर ट्विट केले, आणि लगेचच ते डिलीट झाले. त्यानंतर स्वामी काही काळ शांत झाले. जे माणूस कधीच गप्प बसत नाही, तो अचानक गप्प बसतो तेव्हा शंका येणारच. “स्वामींचे जगदीप धनखड झाले काय?” असा प्रश्न विचारला जाणे, हेच पुरेसे आहे.
स्वामी यांनी १९ डिसेंबरनंतर नवा पंतप्रधान येईल, असे भाकीत केल्याचे जुने स्क्रीनशॉट्स आजही फिरत आहेत. लोक पाहत आहेत, वाचत आहेत, एकमेकांना पाठवत आहेत. म्हणजे फाइल्स उघड झाल्या नसल्या तरी चर्चा मात्र थांबलेली नाही.
एकूण काय तर, एपस्टीन फाइल्स सध्या कागदावर असल्या तरी त्या जगभरातील सत्तेच्या पायााखाली ठेवलेला बारूदाचा साठा आहेत. भारताशी थेट संबंध अजून अधिकृतरीत्या समोर आलेला नसला, तरी प्रश्नांची रांग वाढतच आहे. आणि जिथे प्रश्न जास्त, तिथे उत्तरं कमी तेथेच खरी भीती दडलेली असते.
