रविवारी होणार पारितोषिक वितरण; विविध क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती
नांदेड – येथील अखिल भारतीय पिछडा शोषित संघटन, सप्तरंगी साहित्य मंडळ आणि लसाकम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेस विविध शाळांतील एकूण १३० विद्यार्थी विद्यार्थींनीचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा लोखंडे-कोकरे, आयोजक सुभाष लोखंडे, माणिकराव हिंगोले, अनिल निखाते, वंदना मघाडे, आकांक्षा मगरे आदींची उपस्थिती होती.
रंगभरण चित्रकला स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यातील प्रथम पारितोषिक बीपीएसएसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष एस. जी. माचनवार यांच्या वतीने, द्वितीय आनंदा वाघमारे यांच्या वतीने तर तृतीय बक्षीस केंद्र समन्वयक बालाजी बनसोडे यांच्या वतीने तसेच प्रा. कविता ताटे, इंजि. इंजि. अब्दुल खदीर, संजय अवस्थी यांच्या वतीने उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन येत्या रविवारी दि. २० डिसेंबर रोजी सायं.५ वा. हाॅटेल विसावा येथे होणाऱ्या भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेच्या समारोपीय कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. यावेळी वक्ते प्रा. डॉ. अमोल काळे, प्रो. डॉ. किशोर इंगोले, प्रा. बालाजी यशवंतकर, बालाजी इबितदार, संजय मोरे, अलका मुगटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
