नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील चौफाळा भागाता एका घराच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याच्या अंगठ्या आणि चांदीची चैन असा 63 हजार 950 रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच माहुर बसस्थानकात एक महिला बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असतांना तिच्या पर्समधून 2 लाख 22 हजारांचे सोन्याचे दागिणे चोरण्यात आले आहेत. मारतळा-शिराढोण रस्त्यावर चोरटी वाळू पकडली.
मोहम्मद शोईब मोहम्मद जलील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर 1.30 वाजेच्यासुमारास चौफाळा भागातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या त्यांच्या घराची खिडकी फोडून चोरट्यांनी आतील सोन्याच्या 7 ग्रॅमची अंगठी आणि 20 तोळ्याची चांदीची चैन असा 63 हजार 950 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 373/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मिर्झा हे करीत आहेत.
ईचोरा ता.अर्णी जि.यवतमाळ येथील महिला वंदना धनपाल लिंगायत या 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान बसस्थानक माहूर येथे होत्या. त्यांच्या गावाकडे जाणारी बस आली तेंव्हा बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असलेल्या या महिलेच्या पर्समधील 2 लाख 22 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी चोरले आहेत. माहूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 219/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मडावी अधिक तपास करीत आहेत.
शिराढोण येथील ग्राम महसुल अधिकारी विजय जयराम रणविरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास शिराढोण ते मारतळा जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी एक हायवा गाडी थांबवली. त्या गाडीचा क्रमांक एम.एच.15 एफ.व्ही.6390 असा होता. या गाडीमध्ये 5.5 ब्रास वाळू 18 हजार 271 रुपये किंमतीची चोरून भरलेली होती. हे शासनाचे गौण खनीज आहे म्हणून 20 लाखांच्या गाडीसह चोरटी वाळू सुध्दा जप्त करण्यात आली असून उस्माननगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 288/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वडजे अधिक तपास करीत आहेत.
माहूर बसस्थानक 2 लाख 22 हजारांची चोरी; चौफाळ्यात घर फोडले; चोरटी वाळू पकडली
