कंधार (प्रतिनिधी) -सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी लाच मागितल्याप्रकरणी कुरुळा व नागलगाव सर्कलचे मंडळ अधिकारी शेख नवाज यांच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असतानाही संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही; मात्र लाच मागणी झाल्याचे पडताळणीत सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या शेताच्या सातबारावर नाव ‘विठोबा शंकर खाडे’ असे नोंदले गेले असून प्रत्यक्षात त्यांचे खरे नाव ‘विठ्ठल शंकर खाडे’ आहे. ही दुरुस्ती करून सातबारावर नोंद घेण्यासाठी तक्रारदाराने तलाठ्याकडे आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केली होती. ५ ऑक्टोबर रोजी तलाठ्याने यासंदर्भात नोटीस काढली होती.
त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी तक्रारदार मंडळ अधिकारी शेख नवाज यांच्या कार्यालयात भेटीस गेले असता, दोन दिवसांत सातबाराचे काम पूर्ण होईल असे सांगून काम झाल्यानंतर ३,००० रुपयांची मागणी करण्यात आली, असा आरोप तक्रारीत नमूद आहे. पुढे २८ ऑक्टोबर रोजी शेख नवाज यांनी तक्रारदारास तुमचे सातबाराचे काम पूर्ण झाले असून व्हॉट्सॲपवर सातबाराची पीडीएफ पाठवली आहे, भेटायला या, असे सांगितले.
या लाच मागणीची पडताळणी ३ नोव्हेंबर रोजी कंधार तहसील कार्यालयात करण्यात आली. सातबाराचे काम करून दिल्याच्या मोबदल्यात ‘बक्षीस’ म्हणून ३,००० रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे शासकीय पंचांसमक्ष सिद्ध झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नमूद केले आहे.
यानंतर ३, ४ आणि १२ नोव्हेंबर रोजी शेख नवाज यांच्याविरुद्ध कंधार तहसील कार्यालयात सापळा कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले; मात्र संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही. तरीही लाच मागणी झाल्याचे पुरावे आढळल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंधार पोलीस ठाण्यात शेख नवाज यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वृत्त लिहेपर्यंत शेख नवाज यांना अटक करण्यात आलेली नव्हती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के. एस. पठाण करीत आहेत.
