राजयोगी शिवराज पाटील चाकूरकरांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)- देशाच्या चारही सभागृहाचे नेतृत्व करणार्‍या निष्कलंकीत राजयोगी नेतृत्वाचा 12 डिसेंबर रोजी लातूर येथील देवघर या त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 91 व्या वर्षी सकाळी 6 वाजेच्यासुमारास निधन झाले. ही बातमी अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली. त्यंाच्यावर दि.13 डिसेंबर रोजी लातूर येथील वरंवट या त्यांच्या शेती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजकारणातील राजयोगी म्हणून ज्यांच्याकडे बघीत जात असे शिवराज पाटील चाकूरकर यांच नाव समोर येत. जन्म 12 ऑक्टोबर 1935. राजकारणाची पहिली सुरूवात 1966 मध्ये ते लातूरच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. यानंतर आमदार, खासदार, देशाच्या चारही सभागृहाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. राजकारणातील राज्य आणि केंद्रातील विविध मंत्री पदही त्यांना मिळाली. देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष ते राज्यपाल असे विविध पद त्यांनी उपभोगले आहेत अशा या राजकारणातील निष्कलंकीत व्यक्तीमत्वाचा दि.12 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांना विविध स्तरातून भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यात वास्तव न्यूज कार्यालयातूनही भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील मान्यवरांकडून श्रध्दांजली
पितृतुल्य मार्गदर्शक हरपलाः खा. अशोकराव चव्हाण
लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, देशाचे एक व्यासंगी व कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राष्ट्रीय राजकारणात ते महाराष्ट्राचा एक चेहरा होते. त्यांनी आयुष्यभर सार्वजनिक प्रश्नांना अग्रक्रम दिला आणि देशसेवा केली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी अनेक दूरदर्शी धोरणे अवलंबली. त्या धोरणांचा प्रभाव व सकारात्मक परिणाम आजही दिसून येतो. राजकारण, समाजकारण व प्रशासनात त्यांनी दिलेले योगदान चिरंतर राहिल.शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन माझ्यासाठी मोठी वैयक्तिक हानी आहे. डॉ. शंकरराव चव्हाण व त्यांचे बंधुत्वाचे नाते होते. मागील अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबात आत्मियतेचे संबंध राहिले आहेत. सार्वजनिक कार्यात त्यांनी मला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
सुसंस्कृत नेता गमावला-माजी खा.खतगावकर
ज्येष्ठ नेते, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी राज्यपाल, लोकसभेचे माजी सभापती आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज निधन झाल्याचे समजले. ही अत्यतं दुःखद घटना असून मनाला चटका लावणारी आहे त्यांच्या जाण्याने राजकारणातील शिस्तप्रिय, सुसंस्कृत व मुल्यनिष्ठ अध्याय समाप्त झाला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध जवाबदा-या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत.आमचे नेते देशाचे माजी गृहमंत्री श्रध्देय स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी काम केले, चव्हाण व चाकुरकर परिवाराचे कौटुंबीक आणि जिव्हाळयाचे संबंध होते.शिवराज पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली.संसदेत त्यांच्या वागणुकीत आणि विचारमंथनात एक आदर्श राजकीय व संस्कृतीचे दर्शन घडत असे त्यांच्या जाण्याने सुसंस्कारित आणि राष्ट्रीय हिताचा विचार ठेवणारा नेता गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो हीच प्रार्थना व त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
देशाची अपरिमित हानी : खा. डॉ. अजित गोपछडे
भारताचे माजी गृहमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय पातळीवरील दूरदर्शी नेतृत्व श्री शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. चाकूरकर यांच्या निधनाने एक युग संपल्याची भावना निर्माण केली. त्यांचे निधन ही महाराष्ट्राची आणि राष्ट्राची अपरिमित हानी आहे. सार्वजनिक जीवनात विलक्षण प्रामाणिकपणा, संयम आणि नैतिकता जपत भारतीय राजकारणावर अमिट ठसा उमटवला. पाच वेळा खासदार, गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय संरक्षण मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी कार्य करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च मान दिला. वैयक्तिक आयुष्यातील दुःखद प्रसंग असो किंवा राजकीय आव्हाने त्यांची तटस्थता आणि स्थिरता कधीही ढळली नाही. त्यांचे कुटुंबिय शैलेश, डॉ. अर्चना, . रुद्राली, ड. कुशाग्रसिंह, ड. रुषिका आणि इतर स्नेहीजनांना मनःपूर्वक संवेदना. राष्ट्राने हरवलेला हा थोर मार्गदर्शक आणि विचारवंत, यांचा स्मृतिवास दीर्घकाळ प्रेरणादायी व दीपस्तंभासारखा उजळत राहील. परमपिता परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या महान आत्म्यास परमशांती लाभो.
चाकूरकरांच्या निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपला : आ. चिखलीकर
महाराष्ट्रसह देशाच्या राजकारणावर अनेक दशकं निर्विवाद वर्चस्व गाजविणारे , देशाच्या सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अमूल्य योगदान देणारे तपस्वी नेतृत्व , देशाचे माजी गृहमंत्री , पंजाब राज्याचे माजी राज्यपाल , महाराष्ट्राच्या विधिमंडळातील अनेक खात्यांचे माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने केवळ देशाचेच नाही तर माझे मोठे कौटुंबिक नुकसान झाले आहे. दिवंगत चाकूरकर यांनी महाराष्ट्रील असंख्य युवकांचे नेतृत्व घडवले आहे. यात माझाही समावेश आहे. मी युवक कॉंग्रेसमध्ये असताना युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष व सभापती म्हणून त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला मिळाली. याकाळात त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत होते . त्यांच्या निधनामुळे एक जानते नेतृत्व देशाने गमावले आहे. असा शोक संदेश आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!