नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात होताच निर्माण झालेला गोंधळ हा अपघात नाही, तर गेल्या अनेक वर्षांच्या निष्काळजी, भोंगळ आणि बेजबाबदार प्रशासकीय व्यवस्थेचा परिपाक आहे. विद्यापीठाने नेमलेल्या बहिस्थ परीक्षकांच्या अहवालांनी स्पष्ट केले आहे की, शंभरहून अधिक महाविद्यालयांनी शिक्षण नावाच्या पवित्र घटकाची अक्षरशः थट्टा केली आहे.
ज्या प्रयोगशाळांचे फोटो दाखवून महाविद्यालयांनी सलग्निता घेतली, त्याच प्रयोगशाळा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. असा धक्कादायक खुलासा बहिस्थ परीक्षकांनी विद्यापीठाला दिलेल्या अहवालात केला आहे. रसायनं नाहीत, उपकरणं नाहीत, प्रयोगांसाठी आवश्यक जागाही नाही. काही ठिकाणी शिक्षकच नियुक्त केलेले नाहीत. प्रयोगशाळा नाहीत, साधनसामग्री नाही, प्राध्यापक नाहीत; मग विद्यार्थ्यांना काय व कोणी शिकवले? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्यांच्या हातून चूकच झाली नाही, त्या विद्यार्थ्यांचेच भविष्य या गोंधळामुळे धोक्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता निर्माण होताच विद्यार्थी संतापले आहेत. त्यांच्या नाराजीचा रोष महाविद्यालयांपेक्षा विद्यापीठाकडेच अधिक वळतोय, कारण सलग्निता देणे, सुविधा पडताळणे आणि गुणवत्ता नियंत्रण हे विद्यापीठाचे मूलभूत कर्तव्य आहे. शिक्षण कागदावर, शुल्क मात्र वसूल ही विद्यार्थ्यांची जळजळीत हाक, आणि विद्यार्थी निष्पाप; मग त्यांना परीक्षा न होण्याची शिक्षा का?
शैक्षणिक ऑडिटचे अहवाल, सलग्निता मंजुरी आणि वार्षिक तपासण्या यात एवढ्या मोठ्या त्रुटी कशा काय सुटल्या? पाहणी समित्या खरोखरच महाविद्यालयात गेल्या होत्या की, केवळ दस्तऐवज पाहून शिक्कामोर्तब केले? हे प्रश्न आता दबक्या आवाजात नव्हे तर उघडपणे विचारले जात आहेत.
प्रत्यक्ष शिक्षण न देता फक्त नावे दाखल करून, प्रयोगशाळा दाखवून आणि शुल्क वसूल करून भविष्यातील शास्त्रज्ञ, अभियंते आणि संशोधक यांच्या पाया कमकुवत करण्याचा हा उद्योग आहे. विद्यापीठाने जर यावर ठोस भूमिकेऐवजी मौन बाळगले, तर विद्यार्थी संघटना आक्रमक पवित्रा घेतील तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान शून्य ठेवून तातडीने पर्यायी पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्यात, निष्काळजी महाविद्यालयांची सलग्निता रद्द करून कठोर कारवाई करावी. परीक्षा सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयांची प्रत्यक्ष (ऑफलाइन) पाहणी अनिवार्य करावी व कागदी ऑडिटला पूर्णविराम द्यावा असे एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेने डॉ. सचिन खडके व गजानन पाटील इंगोले यांच्या नेतृत्वाखाली निवेदनात स्पष्ट मागण्या केल्या आहेत.अन्यथा कारवाई न तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनातं म्हंटले आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांचा भयानक खेळ; विज्ञान-तंत्रज्ञान अभ्यासक्रमातील गोंधळाने शिक्षण व्यवस्थेची पोलखोल; विद्यापीठ प्रशासन झोपेत की जाणूनबुजून मौनात?
