महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे, अधिवेशनाने राज्यकारभारापेक्षा वैयक्तिक वैराला अधिक प्राधान्य देण्याची परंपरा जोपासण्यास सुरुवात केली आहे. या वेळी केंद्रस्थानी आहेत. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. काही आमदार त्यांच्याविरुद्ध निलंबनाची मागणी करत आहेत, तर काहींनी “हक्कभंग” नावाचा राजकीय चमत्कारही मंचावर आणला आहे.
आता प्रश्न असा पडतो की मुंढे अधिकारी राजकारण्यांना एवढे त्रासदायक का वाटतात?तर कारण अगदी सोपे माणूस कायद्याप्रमाणे काम करतो ही गोष्ट आपल्या राजकीय संस्कृतीत पाप मानली जाते!मुंढे यांची 2005 पासूनची कारकीर्द म्हणजे अनधिकृत चहापानांचे RSVP न स्वीकारणाऱ्या, आणि फाइलसमोर येताच “हे कायद्यात बसते का?” हा प्रश्न विचारणाऱ्या अधिकाऱ्याची देशभरची यात्रा. वीस वर्षांत पंचवीस बदल्या हे ऐकून कुणालाही वाटेल की माणसाने सरकारी सेवेत नसून सर्कसमध्ये नोकरी केली असावी.
नांदेडपासून पंढरपूर, नागपूर ते नवी मुंबई आणि अनेक विभाग प्रत्येक ठिकाणी त्यांचे काम लोकांना आवडले आणि काही विशेष लोकांना रागवले. वारकऱ्यांना पहाटे अडीचपासून दर्शन मिळावे म्हणून नियम बदलले, व्हीआयपी संस्कृतीवर बंधने घातली, चंद्रभागेचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या—एकूण काय, “जनतेसाठी काम करणे” हा अवघड आणि राजकीय दृष्ट्या धोकादायक प्रकार केला.
त्यातही त्यांनी आयुष्यातील काही पापे तर मोठी—
• कोणाच्याही कार्यक्रमात जाऊन नि:शुल्क भोजन न करणे,
• वेळेवर हजर राहणे,
• बेकायदेशीर गोष्टींना चारा न देणे,
• आणि फाइल हातात आली की कायद्याची चाळणी वापरणे.
बरेच राजकारणी याला अहंकार समजतात, कारण त्यांना वाटते नियम हे फक्त इतरांसाठी असतात.
आता विवादाचा मुद्दा नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे.
खोपडे साहेबांचे आरोप आहेत की स्मार्ट सिटीचे काही कोटी रुपये मुंढे यांनी अधिकाराशिवाय खर्च केले. या आरोपांची चौकशी झाली असल्याचा दावा केला जातो, पण व्यंगाच्या दुनियेत तथ्ये नेहमीच राजकारण्यांच्या पायात येऊन पडतात, त्यामुळे आपण तपशीलांवर पाय ठेवून पुढे जाऊ.
एक वेगळे प्रकरण नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी भरती. न्यायालयीन निर्णय, नोकऱ्या, रद्दबातल, पुन्हा दावे एकूण प्रकरण भलतेच गुंतागुंतीचे. या प्रक्रियेत मुंढे यांनी फाइल तपासताना काही नियुक्त्या चुकीच्या असल्याचे नोंदवले आणि नियमाप्रमाणे कारवाई केली आणि समजा, त्यातून काही लोक नाराज झाले असल्यास त्यात आश्चर्य काय?
राजकारणात एक न लिहिलेला नियम आहे—
“प्रामाणिक अधिकारी हा नेहमीच अडचणीचा अधिकारी.”
आणि हा नियम मुंढे यांच्या बाबतीत नेहमीच तंतोतंत लागू होतो.मुंढे जिथे गेले तिथे लोकांनी आंदोलन करून “हा अधिकारी आम्हाला हवा” असे सांगितले आणि जेव्हा जनता एखाद्या अधिकाऱ्याबद्दल असे म्हणते तेव्हाच काही नेत्यांच्या रात्रीची झोप उडते. कारण जनता खुश असणे हा काही त्यांचा आराखडा नसतो.
आणि म्हणूनच आज विधानसभेत हे सगळे नाट्य घडत आहे.
जनतेच्या मनात प्रश्न एक चांगल्या अधिकाऱ्यावर पुन्हा काहीतरी कारवाई होणार का? राजकारण्यांच्या मनात भीती कायद्याचा आदर करणारा अधिकारी पुन्हा येणार तर नाही ना?
कायमचा निष्कर्ष?
तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी राजकारण्यांना आवडत नाहीत कारण ते कोणाचा फायदा करण्यासाठी आलेले नाहीत, तर कायद्याचे पालन करण्यासाठी आलेले आहेत आणि असे लोक आपल्या राजकीय संस्कृतीत सर्वात धोकादायक मानले जातात कारण ते “नियम” नावाच्या जुनाट वस्तूला महत्त्व देतात.अशा अधिकाऱ्यावर वारंवार येणाऱ्या संकटांना एकच नाव.. “राजकीय धिक्काराचा सरकारी पुरस्कार.”
