आज नवी दिल्लीमध्ये ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड’ केरळचे खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांना देण्यात येणार होता. मात्र, त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले की ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. कालपर्यंत भाजपच्या भूमिकेशी साधर्म्य दाखवत व काँग्रेसच्या विरोधात सूर लावणारे थरूर अचानक असे का फिरले, हा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे, काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने त्यांच्या विरोधात कधी कठोर भूमिका घेतली नव्हती.
भाजपने त्यांना काय दिले? तर एक विदेश दौरा आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत डिनर. पण वीर सावरकरांच्या नावाचा पुरस्कार नाकारणे म्हणजे त्यांनी दाखवलेली धिटाई गंभीर विचार करण्यास भाग पाडते. काँग्रेस नेत्यांशी त्यांचे आतून काही बोलणे झाले का? भाजपकडून अपेक्षित मान सन्मान किंवा राजकीय ‘स्पेस’ त्यांना मिळाले नाही का? अथवा त्यांनी वेगळा राजकीय विचार मनात आणला? हे कोडे आहे. कारण शशी थरूर हे विद्वान व्यक्तिमत्त्व असून त्यांचे राजकीय गणित समजून घेणे अवघडच मानले जाते.

काल तिरुअनंतपुरममध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर त्यांनी लोकसभेतील ‘वंदे मातरम्’ चर्चेबाबत टिप्पणी करताना ती “वेळेचा अपव्यय” असल्याचे म्हटले. परंतु निवडणूक सुधारणा-विषयक चर्चा “उत्तम” असल्याचेही नमूद केले. त्यांच्या या विधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या कडून उभ्या केलेल्या अपेक्षांनाच धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण हे दोघे जेव्हा कोणतेही नियोजन करतात, तेव्हा ते अत्यंत काटेकोर असते. ज्यात एखादा अडकला तर बाहेर पडणे कठीण होते, अशी टीकात्मक मांडणी विरोधक करत असतात. अशा परिस्थितीत थरूर यांनी वीर सावरकरांच्या नावाचा पुरस्कार नाकारणे हे निश्चितच धक्कादायक आहे.
या संपूर्ण घडामोडीवर पत्रकार आशिष चित्रांशी आणि अशोक वानखेडे यांनी केलेली चर्चा वाचकांसाठी पुढे देत आहोत.
अशोक वानखेडे यांचे म्हणणे असे की, केरळमधील आगामी निवडणुकांचा विचार करून शशी थरूर यांनी हा निर्णय घेतला असावा. काँग्रेसमध्ये अनेक नेते कमकुवत झाले आहेत, त्यामुळे पुढील काळात मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारी मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी हा राजकीय डाव टाकला असावा. स्वतः थरूर यांनीही ट्विट करून म्हटले की, “या पुरस्काराबाबत मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पुरस्कार देणारी संस्था कोण, का देत आहे, काहीच स्पष्ट नाही, त्यामुळे मी स्वीकारणार नाही.”विशेष म्हणजे, आजच्या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू–काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहणार होते.
अशोक वानखेडे पुढे सांगतात,विनायक दामोदर सावरकर यांचे साहित्य उच्च दर्जाचे आहे, परंतु त्यामुळे मी त्यांना ‘वीर’ म्हणणार नाही. ज्यांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतली, तसेच काही संस्थांना भारतात सामील होऊ नका असे पत्र लिहिले, त्यांना वीर म्हणणे योग्य नाही, असे ते स्पष्ट म्हणतात. वानखेडे आणखी सांगतात की, सावरकर हे भाजपचे ‘टूलकिट’ आहेत त्यांना खर्या अर्थाने भाजप नेत्यांच्या मनात स्थान नाही; फक्त राहुल गांधींच्या विरोधासाठी त्यांचे महिमागान केले जाते. सावरकर हे हिंदू महासभेचे प्रमुख नेते होते, त्यांचा आणि RSS चा कधीच मेळ बसला नाही, असेही ते नमूद करतात.एकूणच, शशी थरूर यांनी मारलेली ही अचानक पलटी सध्या राष्ट्रीय राजकारणातील मोठा चर्चेचा विषय ठरली आहे
