व्लादिमीर पुतिन केजीबीसारख्या जगातील सर्वाधिक निर्दय आणि बुद्धिमान गुप्तहेर संस्थेतील अधिकारी म्हणून घडलेला नेता. अर्थशास्त्र आणि विधी या दोन्ही शाखांचे पदवीधर असलेला हा व्यक्ती कोणत्याही देशाचा राजकीय खेळ एका थंड डोक्याने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि पूर्ण रणनीतीने खेळतो. त्यांचा भारत दौरा काही ‘असामान्य घटना’ नव्हता; भारत–रशियातील वार्षिक शिखर बैठक यंदाही नियमानुसार झाली. फरक एवढाच पुतिन स्वतः आले, आणि याच गोष्टीला भारतीय प्रसारमाध्यमांनी अनावश्यक सोहळा बनवून टाकले.ज्यांना व्लादिमीर पुतीन हे शब्द उच्चारता येत नाहीत,आम्हीच हुशार म्हणणारे ब्लादिमीर पुतीन उच्चार करतात.
व्लादिमीर पुतिन यांच्या भारतदौऱ्यात सर्वाधिक प्रभाव पाडणारा क्षण राजनैतिक करारांचा नव्हता, भाषणांचा नव्हता. तो होता राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वारी घडलेला साधा पण असामान्य प्रसंग. पुतिन यांची गाडी थांबताच दार उघडण्यासाठी उभ्या असलेल्या भारतीय जवानाशी त्यांनी पुढाकार घेऊन हस्तांदोलन केले. हा क्षण केवळ नम्रतेचा नव्हता; तो नेतृत्वाची खरी उंची दाखवणारा होता. सामर्थ्य, अधिकार आणि जागतिक प्रभाव असलेला राष्ट्रप्रमुख एका सैनिकाचा सन्मान राखतो. हे जगभरात फारच थोडे नेते करतात. पुतिन यांची ही कृती माध्यमांना नाट्यमय वाटली असेल, पण प्रत्यक्षात ती एका संस्कारांची, शिस्तीची आणि मानवी सभ्यतेची भाषा बोलणारी होती. भारतातील राजकीय वातावरण जिथे अहंकाराला नेतृत्व समजले जात आहे, तिथे एका जवानाशी केलेले हे हस्तांदोलन जगाला संदेश देऊन गेले,की खरा ‘महान’ तोच, जो सर्वात खालच्या पदावरील माणसाचा मान उंचावतो. आणि त्या एका क्षणाने भारतातील कोट्यवधी लोकांना जाणवले की सत्तेची उंची कधी दिसते तर, जेव्हा शक्तिशाली नेता साधेपणाने हात पुढे करतो.
या भेटीत सर्वाधिक खटकलेली गोष्ट म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री या कार्यक्रमात नव्हते. भारताच्या राजनैतिक परंपरेत ही गोष्ट अभूतपूर्व म्हणावी लागेल. दुसरीकडे शशी थरूर यांची पुतिनसोबत भेट घडवून आणली गेली. इतिहास पाहिला तर नेहरूंपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग कोणाच्याही काळात परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत विरोधी पक्षनेत्याला स्थान नाकारणे ही परंपरेविरुद्धची गोष्ट आहे. या वेळेस मात्र ती परंपरा तोडण्यात आली, आणि यामुळे भारताचीच प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर कमकुवत दिसली.
युरोपीय देशांनी पुतिनला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांनी भारतात येऊन जगाला दाखवून दिले की आशियातील सर्वात मोठी लोकशाही त्यांच्या पाठीशी आहे. याचा फायदा कोणाला झाला? पुतिनला. भारताला? तसे स्पष्ट उत्तर देणे कठीण आहे. कारण या भेटीत भारताकडे स्पष्ट, ठोस, हितसंबंधांचे रेखाटन दिसले नाही.भारतीय प्रसारमाध्यमांनी या संपूर्ण दौर्याचे केलेले रंगरंगोती तर अधिकच विचित्र होती. प्रसार माध्यमांनी मनोहर कहानीया सारखे वर्णन केले व्लादिमीर पुतीन दौऱ्याचे जसे एखाद्या प्रियकराचा पहिल्या प्रेयसीशी ब्रेकअप होऊन दुसरी, ‘अजून चांगली’ प्रेयसी मिळाल्यासारखे वर्णन माध्यमांनी केले. पण राजकारणात भावना नसतात; असतात फक्त हित. आणि या भेटीत भारताचे हित कितपत साधले गेले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.भारताचा राजकीय इतिहास सांगतोजेव्हा परिस्थिती असमतोल, एकतर्फी किंवा प्रचारप्रधान बनते, तेव्हा देशात नवा नायक उभा राहतो. 1976 च्या काळात जयप्रकाश नारायण जसे उभे राहिले, तसेच संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर भारताने नेतृत्व निर्माण केले आहे. आजही देश अशाच एका उंबरठ्यावर उभा असल्याचे जाणवते प्रश्न इतकाच तो नायक पुन्हा केव्हा जन्माला येईल?
