काय झालंय आपल्या महाराष्ट्राला? उन्नत देश, राज्ये कालानुरूप अधिकाधिक प्रगत होत जातात पण महाराष्ट्र अवनत का होतोय? बिनबोभाट दिवसाढवळ्या दंगली, हल्ले, हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार होताहेत. उत्तर भारताला मागास म्हणून हिणवणारे आपण त्यांच्या पंक्तीत केव्हा जाऊन बसलो? कळलेच नाही. ‘पुरोगामी’ म्हणून असलेली महाराष्ट्राची ओळख हळुहळू नाहीशी होतेय की काय? हे भय वाटू लागले आहे. जागतिक स्तरावर ज्यांना अनुसरले जाते ते द्रष्टे समाजसुधारक ह्याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. प्रेम हा महाराष्ट्राचा धर्म होता तो आता ‘द्वेष’ का होऊ लागला आहे? एकजूट ही महान शक्ती म्हणणारे फाटाफूट करण्यावर का भर देताय? समतेचे पाईक विषमतेचे कट्टर वाहक का होत आहेत? सामंजस्य संपून वैर का वाढू लागले आहे? सद्विचारांची भूमी आता विखाराची भूमी म्हणून का ओळखली जातेय? माणसं जोडण्यापेक्षा तोडण्याकडे का आकृष्ट होतायेत? आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बाह्यांगाने वावरताना अंतरंगात मध्ययुगीन विचारांची बुरशी का वागवतायेत लोक? एकीऐवजी बेकीची वाट का धरताहेत? मायेची हिरवीगार वाट सोडून हिंसेची काळीकरडी वहिवाट का पडत चालली आहे वेगाने? कुणाचा आनंद कुणाच्यातरी दु:खाचे कारण का बनत चालले आहे? ‘धर्म पुछा; जाती नही!’ म्हणणारे वैचारिक दरिद्री एकाच धर्मातील लोकांनी एकमेकांवर केलेल्या अत्याचार, शोषण, बलात्कार ह्यावर का बोलत नाहीत? हे सोयीचे मौन अन सोयीची भूमिका का बाळगतात लोक?
आधुनिक, स्वतंत्र विचारांचा, सर्वांगाने समतोल साधणाऱ्या महाराष्ट्राचा ताल अलीकडे एवढा का बिघडू लागला आहे? सत्तापिपासू विखारी लांडग्यांनी त्याची शिकार केल्यासारखा तो गलितगात्र का होऊ लागला आहे? त्याच्यातील चळवळ का थंडावते आहे? अन्यायाविरोधात उसळून येणारी बंडखोरी कुठे गेली? महापुरुषांचा विचार आपल्या उक्तीकृतीतून जिवंत राहत असतो केवळ पेहरावाची नक्कल करून अक्कल येत नसते. रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करणारे न्यायनिष्ठ शिवाजीमहाराज कुठे आणि कपाळावर चंद्रकोर कोरून, दाढी राखून वावरणारे आजचे बहुसंख्य अविचारी तरुण कुठे? प्रज्ञा, शील, करुणा आणि पंचशील देणारे प्रज्ञासूर्य बाबासाहेब कुठे? आणि त्यांना डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यावर घेणारे उथळ तरूण कुठे? ‘निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी?” म्हणणारे ‘सार्वजनिक सत्यधर्म’ व विश्वबंधुत्वाचा विचार देणारे क्रांतीबा फुले कुठे? आणि कर्मकांडात अडकून स्वजातीचे डबके बनवून घेत असणारे दांभिक कुठे? ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ चे तत्व आपल्या कृतीतून ह्या मातीत रुजवणारे राजर्षी शाहू महाराज कुठे? आणि आजचे हेक्टरने जमिनी, कारखाने आपल्या खिशात घालणारे लोभी स्वार्थी सत्ताधीश कुठे?
महाराष्ट्रात संतांनी सर्वधर्मसमभाव, बंधुभाव, खरी भक्ती, कर्मयोग, ज्ञान तसेच अंधश्रद्धा आणि जातीभेदनिर्मूलनावर जोर दिला. सामान्यांना अध्यात्मिक ज्ञान सोप्या भाषेत देत समानता, प्रेम, परोपकार रुजवला. पण आज महाराष्टाचा चेहरा विकृत विद्रूप होऊ लागलेला दिसतोय. महाराष्ट्र म्हणजे दगड, माती, झाडं, डोंगर, नद्या नाहीत तर ह्या महाराष्ट्रात राहत असलेली, काया वाचा मन असणारी जिवंत माणसे आहेत मग आज महाराष्ट्राचा चेहरा विद्रूप करणारे, त्यातील शांती नासवणारे, रक्तपात करणारे माणसंच तर ह्या साऱ्या अधोगतीला कारणीभूत आहेत.
‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे! ही प्रार्थना आपल्या चित्तात ठसवणारे सानेगुरुजी ह्याच मातीतले. “माझ्या दाढीला जेवढे केस आहेत, तेवढी बहुजनांची पोरं शिकवून, मनुवाद्यांच्या छाताडावर थयथया नाचविन” म्हणणारे व आपला शब्द अपार कष्टाने ह्यातीतच पूर्ण करत रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष निर्माण करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समर्पण, बांधिलकी आणि नैतिक अधिष्ठान कुठे? अन अलीकडे विद्यार्थ्यांच्या डोनेशनवर तिजोऱ्या भरणारे, शिष्यवृत्यांचा काळा बाजार करणारे, मतांची हक्काची पेढी तयार करणारे निलाजरे शिक्षणसम्राट कुठे? अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक सुधारणा करत ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना, मुरळी प्रतिबंधक चळवळ, सेवासदनसारख्या संस्था स्थापन करणारे विठ्ठल रामजी शिंदे हेही महाराष्ट्राचे भूषण आहे. दलिताहून दलित असलेल्या स्त्रीजातीसाठी महाराष्ट्रात मुलींसाठी पहिली शाळा काढणारे सावित्रीबाई-ज्योतिबा. विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, ‘सुधारक’ आणि ‘केसरी’ या वृत्तपत्रांद्वारे सामाजिक जागृती घडविणारे गोपाळ गणेश आगरकर. समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ महादेव गोविंद रानडे. सामाजिक सुधारणांसाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे गोपाळ हरी देशमुख. परमहंस सभेचे संस्थापक सदस्य आणि प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भूमिका बजावणारे समाजसुधारक आत्माराम पांडुरंग तर्खडकर. ह्या आणि अशा अनेक महापुरुषांच्या कार्य, विचारांचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आजही जेव्हा दलित,पारधी,भटके,आदिवासी यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्या तोंडावर मुत्र विसर्जन केले जाते, खालच्या जातीतील म्हणून त्यांच्या हत्या, बलात्कार केला जातो पण कुणाच्या काळजाला पाझर फुटत नाही की दु:ख होत नाही. का मागासवर्गीय माणसं नाहीत?
खैरलांजी, नितीन आगे, सोनई, जवखेडा, शिर्डी, सोमनाथ सूर्यवंशी ही काही अलीकडची ठळक जातीभेदातून बळी घेतलेली काही ठळक उदाहरणे. अशा कित्येक घटना आहेत मात्र साऱ्याच माध्यमात येत नाहीत वा येऊ दिल्या जात नाहीत. ह्याच जातीयवादातून नांदेडच्या सक्षम ताटे ह्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आख्ख्या राज्याला हादरवणारी ही घटना नुकतीच नांदेडमध्ये घडली. आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे सक्षम ताटे या तरूणाची भरदिवसा हत्या करण्यात आली. त्याची प्रेयसी आचल मामीलवाड हिचे वडील आणि दोन भावांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या, त्यानंतरही तो जिवंत होता हे पाहून त्याच्या डोक्यात फरशी घालून निर्ममपणे त्याचा जीव घेतला. प्रेयसी आंचल मामीडवारने आपल्या वडिलांसह दोन्ही भावांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तर केलीच पण त्याच्या मृतदेहाशी विवाह करून त्याच्याच घरी त्याची पत्नी बनून राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घरच्यांनीही तिला स्वीकारले. ‘तो आपल्यापेक्षा खालच्या जातीचा आहे. त्याच्याशी संपर्क ठेवू नको; इतर कुणीही चालेल पण दलित मुलाबरोबर तू लग्न करता कामा नये’ असे तिच्या घरच्यांचे मत होते. सक्षम ताटे आणि आचल मामीडवार यांचं एकमेकांवर प्रेम होतं. आचल ही पद्मशाली समाजातील आहे. जात वेगळी असल्यामुळे घरच्यांचा आमच्या विरोध व त्यातून कायद्याला न घाबरता सक्षमची हत्या असे हे क्रूर प्रकरण आहे.
मुळात आपला समाज आजारी आहे. त्याला जातीवादाच्या रोगाने पछाडले आहे. इतर देशांची प्रगती जातपात नष्ट झाल्याने होते. माणूस वा नागरिक म्हणून ते आपला देश वा राज्यासाठी झटतात आपल्याच बांधवांचे मुडदे पाडत नाहीत आणि महत्वाचे म्हणजे जी जात मिळण्यात आपले कुठलेच कर्तुत्व नाही त्याचा उन्माद का वाटत असेल ह्या तथाकथित उच्चवर्णीयांना? जन्माने मिळणाऱ्या गोष्टींचा उन्माद-अहंकार असण्यापेक्षा गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेल्या कर्तुत्वाचा अभिमान असावा. पण इथे लक्षात कोण घेतो? आपल्या विशुद्ध प्रेमावर विश्वास ठेवून जात संपवू पाहणारी २१ वर्षाची आंचल एकीकडे आणि मुलीने दलित मुलासोबत लग्न केले तर आपली जातप्रतिष्ठा जाईल म्हणून सक्षमची हत्या करणाऱ्या त्यांची हत्येनंतर प्रतिष्ठा वाढली का हो? नेमके काय मिळाले त्यांना? ह्या जातीयद्वेषातून काय साध्य केले त्यांनी? एका अपंग बापाच्या एकुलत्या लेकराचा, त्यांच्या वृद्धत्वाच्या आधाराचा, आशेचा, जीव घेताना किमान आपली लेकरं आठवावीत पण जातीय उन्माद इतका हावी व्हावा की त्या द्वेषाच्या नशेत कसलेच भान राहू नये? सक्षमच्या कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे पण ह्त्या करणारेही शाबूत राहिलेले नाही. त्यामुळे जातीचे विष मनमेंदूत भिनू न देता निखळ ‘माणूस’ म्हणून जगता यायला हवं हे आपल्या लक्षात कधी येणार आहे? १९ व्या शतकात सुरु झालेला जाती अंताचा लढा दुर्दैवाने आज २१ व्या शतकातही सुरु आहे ही भारतीय म्हणून आपल्या प्रत्येकासाठीच वैषम्याची बाब आहे.
डॉ. प्रतिभा जाधव
pratibhajadhav279@gmail.com
(लेखिका साहित्यिक, वक्ता व एकपात्री कलाकार आहेत.)
