भारतीय जनता पक्ष प्रत्येक निर्णयाची जमिनीवर ‘तपासणी’ करते, असा गर्वाने दावा केला जातो. पण मग देशभर हजारो लोकांना विमानतळांवर वेठीस धरणारा हा प्रचंड गोंधळ नेमका कोणत्या तपासणीचा परिणाम होता? पाच हजाराचे तिकीट पंधरा हजार, आणि काही ठिकाणी थेट ऐंशी हजार रुपये! हजारो लोक अडकले, परीक्षा देता आल्या नाहीत, लग्नांच्या समारंभांना पोहोचता आले नाही—या राष्ट्रीय गोंधळाचा निर्माता नेमका कोण? हे सगळे एकट्या इंडिगोची चूक होती का? की कोणी तरी वरून धागे हलवत होता?प्रसारमाध्यमातील एक प्रतिनिधीच म्हणतो “सुरक्षारक्षकांनी मारहाण केली.” मग हा प्रश्न सरळ निर्माण होतो:
ही इंडिगोला बदनाम करण्याची पूर्वनियोजित स्क्रिप्ट होती का?
सरकारने बनवलेल्या नवीन नियमावलीला झुगारण्यासाठी इंडिगोने स्वतःच हा ‘गोंधळाचा महोत्सव’ आयोजित केला, असा संशय काही तज्ञांकडून व्यक्त केला जातो. पण दुसरा आणि अधिक गंभीर आरोप असा—की हा सगळा खेळ इंडिगोने नाही, तर सरकारच्या ‘विशेष मित्रां’च्या फायद्यासाठी तयार झाला.
याचे पुरावे म्हणून समोर येणाऱ्या काही घटनांचा क्रम अतिशय विचित्र आहे:
FSTC ही पायलट ट्रेनिंग कंपनी 820 कोटींना खरेदी होते.
त्यानंतर फक्त तीन दिवसांत देशात “पायलट कमी”, “फ्लाइट रद्द”, “विमानतळांवर गोंधळ”—अशी राष्ट्रव्यापी हाहाकार निर्माण होतो.
आणि हा गोंधळ अडाणीसमूहाला अप्रत्यक्ष फायदा करून देणारा ठरू शकतो, असा गंभीर आरोप विविध ठिकाणी होताना दिसतो.
ही पहिली वेळ नाही. देशभर “कोळशाची कमतरता” पसरवून नंतर निकृष्ट कोळसा महागात विकला गेला. असा जुनाच फार्म्युला लोकांच्या लक्षात अजून ताजा आहे. आणि आता त्याच तंत्राने विमानसेवा क्षेत्रात गोंधळ निर्माण केला गेला का, हा प्रश्न आज प्रत्येक जागरूक नागरिक विचारतो आहे.
भारत सरकारच्या धोरणांचा अडाणी समूहाशी असलेला विलक्षण जुळवाजुळव लपलेली नाही:
- मध्य प्रदेशातील प्रकल्पासाठी सहा लाख झाडांची कत्तल—जनक्षोभ असूनही प्रकल्प जसाच्या तसा.
- अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात चौकशा आणि आरोप—तरीही भारतात सर्व काही सुरळीत!
- कमी दर्जाचा कोळसा महागात विकणे आणि उत्कृष्ट कोळसा स्वतः वापरणे—असे आरोप अनेकदा समोर आले.
- नियम बदलून देशातील मोठ्या विमानतळांचे व्यवस्थापन अडाणी समूहाला देणे—ही तर आता सर्वश्रुत बाब आहे.
इंडिगोचे मालक राहुल भाटिया यांनी 20 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेतले होते, हा मुद्दा तर आगीत तेल ओतणारा आहे.
म्हणूनच, गेल्या काही दिवसात विमानतळांवर दिसलेली अराजकता, जनतेचा अपमान, आणि विमानतिकिटांच्या किंमतींचा आकस्मिक स्फोट—
हे सर्व फक्त इंडिगोची चूक म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आज एकच प्रश्न पेटलेल्या अंगारासारखा धगधगत आहे:
हा गोंधळ फक्त इंडिगोचा होता?
की यात सरकार आणि त्यांच्या ‘एकमेव प्रिय व्यावसायिक मित्रा’साठी रचलेला अदृश्य डाव दडलेला होता?
आणि जर हे सत्य असेल—
तर भारतीय नागरिकांच्या सहनशीलतेच्या मर्यादांना यापेक्षा मोठा अपमान दुसरा असूच शकत नाही.
