नांदेड- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यानी http//hmas.mahait.org या संकेतस्थळावर गुरूवार 30 नोव्हेंबर 2025 तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन भरलेला अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची एक प्रिंट आवश्यक कागदपत्रासह संबंधित शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाकडे जमा करणे बंधनकारक आहे. संबंधीत महाविद्यालयाने सदरचे प्राप्त झालेले अर्ज एकत्रीत करून, यादी तयार करून प्रमाणित करून आपल्या कव्हरींग लेटरसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर,नमस्कार चौक,नांदेड येथील कार्यालयात दाखल करणे बंधनकारक आहे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाने केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 करिता नविन अर्ज करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशास पात्र असुन त्यांना प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी १३ जुन २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.बीसीएच 2016/प्र.क्र.293/शिक्षण/2 दि.26.12.2024 च्या शासन निर्णयामध्ये नमुद 2 अ मधील 11 मध्ये स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीतजास्त 30 नोव्हेंबर पर्यंत राहील असे नमुद आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सदर योजनेचा लाभ घेवू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे अर्ज करावयाचे आहेत. *लाभाचे स्वरूप* या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खालील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. खर्चाची बाब, नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी.परिसरातील महाविद्यालये/ शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम, तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम क्रमवारी पुढीलप्रमाणे राहील. भोजन भत्ता- मनपा क्षेत्र व मनपा हद्दीपासून 5 किमी परिसरात 25 हजार, तालुक्याच्या ठिकाणी 23 हजार. निवास भत्ता- मनपा क्षेत्र व मनपा हद्दीपासून 5 किमी परिसरात 12 हजार, तालुक्याच्या ठिकाणी 10 हजार. निर्वाह भत्ता- मनपा क्षेत्र व मनपा हद्दीपासून 5 किमी परिसरात 6 हजार, तालुक्याच्या ठिकाणी 5 हजार. प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम- मनपा क्षेत्र व मनपा हद्दीपासून 5 किमी परिसरात 43 हजार, तालुक्याच्या ठिकाणी 38 हजार रुपये राहील. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. (वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल). *योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष* विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्याने मागील वर्षात किमान ५० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी ३% आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा ४०% असेल. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. तालुक्याच्या ठिकाणी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्राच्या ह्द्दीत असलेली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. उर्वरित अटी व शर्ती वेळोवेळी शासनाद्वार निर्गमीत करण्यात आलेल्या/येणाऱ्या शासन निर्णयानुसार लागू राहतील. *सूचना* विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची १२% व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र,त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. Kanthak Suryatal Post Views: 897 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा “बिहार मतदार यादीचे गूढ: न्यायालयाचा विश्वास, आयोगाचा मौन आणि जनतेचा प्रश्नचिन्ह!”