नितीश ऑन टॉप… मोदी झाले ऑफ?”

बिहार विधानसभेची निवडणूक आता उमेदवार जाहीर करण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. एनडीए घटक पक्षांमध्ये सध्या मोठे राजकीय घडामोडी सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाने ७२ आणि १२ अशा दोन स्वतंत्र याद्या जाहीर करून आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ‘इंडिया’ गटात शरद पवार यांनी देखील निवडणूक चिन्हांचे वाटप सुरू केले आहे.या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीचे गणित अजून स्पष्ट झालेले नाही. बिहारचा बारकाईने अभ्यास करणारे जाणकार सांगतात की, मुख्यमंत्री नितीश कुमार भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाहीत. महाराष्ट्रात जे घडले, ते बिहारमध्ये घडू नये अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे गरज पडल्यास ते आपली भूमिका बदलून तेजस्वी यादव यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, बिहार निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे हे स्पष्ट दिसते.

जदयूने (जनता दल युनायटेड) सर्वप्रथम चिन्हांचे वाटप केले आणि त्यानंतर आपल्या उमेदवारांची यादीही जाहीर केली. भारतीय जनता पक्षाने काही उमेदवारांची नावे अद्याप राखून ठेवली आहेत. दरम्यान, जदयूने एक नवा मुद्दा समोर आणत निवडणुकीला आणखीनच रंगत आणली आहे. त्यांनी एनडीएकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच घोषित करण्याची मागणी केली असून तो चेहरा नितीश कुमारचाच असावा, अशी त्यांची भूमिका आहे.भाजप नेते बिहारमध्ये सांगत आहेत की ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. मात्र नितीश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे नीट माहिती आहे की भाजपाचे असे बोलणे नेमके काय सूचित करते. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या आधी असेच बोलले गेले, मात्र नंतर परिस्थिती बदलली. त्यामुळेच नितीश कुमार यांची मागणी आहे की त्यांना औपचारिकरीत्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात यावे, म्हणजे निवडणूक जिंकल्यानंतरही तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहतील.

गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार यांनी उमेदवारांना तिकिट वाटप आणि चिन्ह वाटपात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपाचे “स्लीपर सेल” निष्क्रिय झाले आहेत, असे निरीक्षण केले जात आहे. युतीमध्ये जदयूला १०१ जागा मिळाल्यानंतर नितीश कुमार यांची भूमिका अधिक ठाम झाली आहे.सोशल मीडियावरही राजकीय संदेश मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. जदयूचे संजय झा आणि भाजपचे बिहार अध्यक्ष जयस्वाल पत्रकार परिषदेत वारंवार सांगत आहेत की एनडीएमध्ये कोणताही मतभेद नाही. मात्र, पक्षांच्या कार्यालयासमोर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. त्याचवेळी भिंतीवर “सरकार आम्ही बनवणार” असे घोषवाक्य दिसत आहे.

बीजेपीचे म्हणणे आहे की ‘महागठबंधनात फूट पडली आहे’, तर एनडीएचे जागावाटप व निवडणूक तयारी सुरळीत सुरू आहे. तरीही सतत “एनडीए एकजूट आहे” असे सांगण्याची गरज का भासते आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.बीजेपीने केलेल्या ट्विटनुसार, “आजपासून एक महिन्यानंतर बिहार पुन्हा एनडीए सरकार निवडेल. सुशासन, विकास आणि स्थैर्यासह प्रगतीचे सरकार परत येईल.”

 

जदयूनेही ट्विट केले आहे, “एनडीए बिहारमध्ये पुन्हा इतिहास रचणार आहे. कार्यकर्ते तयार आहेत, बिहारही तयार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.” जागावाटपात जदयू १०१, भाजप १०१, एलजेपी-आर २९, आरएलएम ६ आणि एचएएम ६ जागांवर लढणार आहे.

 

जनता दल युनायटेडने आणखी एक ट्विट करत म्हटले आहे, “बिहारच्या रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. शिक्षणाला नवी उंची मिळेल. नितीश कुमार हे प्रत्येक बिहारीचा स्वाभिमानाचे रक्षक आहेत.” विशेष म्हणजे, या ट्विटमध्ये ना नरेंद्र मोदींचा उल्लेख आहे ना त्यांचा फोटो.

 

शालिनी मिश्रा यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्या नितीश कुमारांकडून बी-फॉर्म स्वीकारताना दिसतात. त्यांनी लिहिले “बिहारच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या आदरणीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आशीर्वाद घेत निवडणूक चिन्ह स्वीकारले. बाबा केदारनाथांच्या कृपेने आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने जनसेवेची संधी मिळाली, याचा अभिमान वाटतो.”जदयूच्या प्रचारात नितीश कुमार यांचाच चेहरा केंद्रस्थानी दिसतो आहे, तर इतर एनडीए घटक पक्ष विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा फारसा वापरत नाहीत. पत्रकार अशोक वानखेडे यांच्या मते, जर नितीश कुमार यांना अधिकृत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले नाही, तर निवडणूक प्रचारही अशाच स्वरूपात राहील.

 

वरच्या पातळीवर एकमेकांमध्ये पूर्ण समन्वय नसेल तर कार्यकर्त्यांमध्ये मतांचे हस्तांतरण होणे कठीण ठरते. युती तेव्हाच यशस्वी ठरते जेव्हा नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने लढतात.या संपूर्ण घटनाक्रमात सर्वात मोठा धोका भाजपसमोर उभा आहे. जरी जदयूच्या जागा कमी आल्या तरी नितीश कुमार यांच्यासाठी अनेक राजकीय पर्याय खुले आहेत. पण भाजपसाठी बिहार निवडणूक जिंकणे अत्यावश्यक आहे, कारण पराभवाचा परिणाम थेट दिल्लीपर्यंत जाणार आहे.आता काय घडते, कोणता पक्ष पुढे जातो आणि कोणते समीकरण उभे राहते, हे पाहण्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!