नांदेड – भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय तसेच राम मनोहर लोहिया ग्रंथालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज करण्यात आले होते. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
भारताला जागतिक महासत्ता म्हणून आंतरराष्ट्रीय क्षितीजावर नेण्याचे स्वप्न देशातील तरुणाईचा डोळ्यात पेरणारे तसेच पुस्तकांचा लळा आयुष्यभर बाळगणाऱ्या मिसाईल मॅन म्हणून जगविख्यात असलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व आवड असणे यावर त्यांचे विचार व्यक्त केले तसेच राम मनोहर लोहिया सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार यांनी उपस्थित आमचे आभार मानले या कार्यक्रमास प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, राजू पाटील, उत्तम घोरपडे तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
