भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ; विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना 

 

नांदेड:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये ऑनलाईन पोर्टलवर सेंड बॅकद्वारे त्रुटींची पूर्तता करता येत नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी समाज कल्याण आयुक्त, पुणे यांच्या स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आलेली असून, यावेळेसची मुदतवाढ अंतिम असून शैक्षणिक वर्ष 2024-25 याच वर्षातील विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन अर्जासह संपूर्ण कागदपत्राच्या छायांकितप्रती 25 सप्टेंबर 2025 पर्यंत समाज कल्याण कार्यालय, नांदेड येथे स्वतः दाखल करावीत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहेत.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक सन 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 10 जून 2025 पर्यंत त्रुटींची पूर्तता करण्याबाबतची संधी देण्यात आली होती. परंतू ऑनलाईन पोर्टल वरील तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थांकडून त्रुटीची पूर्तता करण्यात आली नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे यासाठी विद्यार्थ्यांना त्रुटीची पूर्ततेकरिता मुदतवाढ देण्याबाबतचे आयुक्तालयाने निर्देश दिले आहेत.

 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!