नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील कॅनॉल रोड भागात सुरू असलेल्या रेड ओके स्पा-2 येथे पोलीसांनी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी छापा मारला. त्यात चार लोकांविरुध्द महिलांना अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल झाला. या स्पाचा मालक शिवसेना शिंदे गटाचा नांदेड दक्षीणचा युवा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे त्याला अटक झाली नाही काय? या संदर्भाने पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लवकरच आम्ही त्या प्रकरणातील मालक आणि व्यवस्थापक या दोघांना अटक करणार आहोत. कामाच्या व्यस्ततेमुळे हे काम मागे राहिले आहे.
2 ऑगस्ट रोजी सायंकाळी रेड ओके स्पा-2 येथे भाग्यनगर पोलीसांनी धाड टाकली. यासंदर्भाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 425/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या आरोपी सदरांमध्ये अमोदसिंग साबळे (27), पंकज मनोज जांगिड (27), नागसेन अनिल गायकवाड(20), संतोष सुर्यकांत इंगळे(22) आणि रोहन मिलिंद गायकवाड (20) अशी पाच जणांची नावे आहेत. यांच्या आरोप आहे की, यांनी तेथे चार महिलांना अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त केले आहे.
या प्रकरणातील अमोदसिंग साबळे हा या स्पाचा मालक आहे. तो शिवसेना शिंदे गटाचा नांदेड दक्षीणचा युवा जिल्हाप्रमुख आहे. नांदेडमधील दक्षीण आणि उत्तर या दोन्ही आमदारांचे त्याच्यावर छत्र आहे. सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुध्दा त्याचा फोटो आहे. एकीकडे आमदारांच्या पी.ए.पासून भिणारे अधिकारी सुध्दा या जिल्ह्यात आहेत. परंतू भाग्यनगर पोलीसांनी ही धाड टाकून कायदा हा सर्वात मोठा आहे हे दाखवून दिले. आमदारांचे छत्र असल्यामुळे अमोदसिंग साबळेला अटक होत नाही काय? या संदर्भाने भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक तथा गुन्हा क्रमांक 425 चे तपासीक अंमलदार संतोष तांबे यांच्याशी संपर्क साधला असता कामाच्या व्यस्ततेमुळे हे काम मागे पडले आहे. आम्ही लवकरच या प्रकरणातील स्पा मालक अमोदसिंग साबळे आणि व्यवस्थापक या दोघांना अटक करणार आहोत.
मागे राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षामध्ये सुध्दा एका मटका चालकाने प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. त्याची दखल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी घेतली आणि त्या मटका चालकाचा पक्ष प्रवेश झाला नाही. या प्रकरणात सुध्दा अमोदसिंग साबळेकडे असलेले युवा सेना प्रमुख पद काढले जाईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रेड ओके स्पा-2 चा मालक शिवसेना(शिंदे गट) युवा जिल्हाप्रमुख
