मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष कौतुक करताना, त्यांना “सर्वोत्तम कार्य करणारे आणि सर्वात लांब काळ देशाची सेवा करणारे गृहमंत्री” असे संबोधले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “ही तर फक्त सुरुवात आहे.” या विधानानंतर राजकीय वर्तुळात आणि भाजपच्या अंतर्गत पातळीवर सदस्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याची भावना निर्माण झाली आहे.
पत्रकार अशोक वानखेडे यांनी या विषयावर भाष्य करताना सांगितले की, “मी सुद्धा ही बातमी वाचून चकित झालो. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही विचार करावा लागेल की त्यांची भूमिका आणि स्थान यामध्ये कुठे आहे. कारण या विधानाचे दूरगामी परिणाम होणार आहेत.”
अमित शहा यांची प्रशंसा आणि राजकीय संदेश
मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्या कार्यकाळाची प्रशंसा करताना म्हटले की, “शहा हे देशाच्या सेवेतील सर्वात लांब कार्यकाळाचे गृहमंत्री आहेत. आणि ही तर केवळ सुरुवात आहे.या वक्तव्यानंतर अनेक खासदारांमध्ये चर्चा सुरू झाली की, याचा खरा अर्थ काय? यावर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, “अभी तो सुरुवात है” हे विधान एनडीएच्या भविष्यातील युतीबाबत होते. त्यांनी स्पष्ट केले की एनडीए ही एक नैसर्गिक युती आहे, जी १९९९ पासून यशस्वीपणे चालू आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले, “एनडीएच्या प्रत्येक घटक पक्षाने सर्व ठिकाणी एकत्रित काम करावे, राजकीय ताकद कुठे जास्त किंवा कमी आहे, याचा विचार न करता एकसंघ प्रयत्न आवश्यक आहेत.”
बैठकीतील अन्य मुद्दे
या बैठकीत पंतप्रधान मोदी यांचा एनडीएतील नेत्यांकडून सन्मान करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच, पहलगाम येथील दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ ची चर्चा झाली.पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात गृहमंत्री झालेल्या अमित शहा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचाही रेकॉर्ड मोडला आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यापासून ते नक्षलवादाविरोधी मोहिमांपर्यंत त्यांच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेतले गेले आहेत.शहा यांचे विधान होते की, “३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील संपूर्ण नक्षलवाद समाप्त होईल.” भाजपच्या संघटनेला बांधून ठेवण्यातही शहांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
वानखेडे यांचे विश्लेषण : ‘पुढचा पंतप्रधान कोण?’
पत्रकार अशोक वानखेडे यांच्या मते, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता ७५ वर्षांनंतर नरेंद्र मोदी यांच्या सेवानिवृत्तीबाबत विचार करत आहे. संघाला असे वाटते की आता मोदी यांची जागा दुसऱ्याने घ्यावी.”ते पुढे म्हणतात की, “भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव अद्याप निश्चित झालेले नाही. यावर मोठा गदारोळ सुरू आहे. संघाला असा अध्यक्ष हवा आहे की ज्याच्यावर संघाचा ठसा असेल. पण अमित शहा कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणि संघटना आपल्यापासून दूर जाऊ देणार नाहीत.”वानखेडे यांच्या मतानुसार, “अमित शहा संपूर्ण ताकदीने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, कारण नरेंद्र मोदी यांचे अस्तित्वच शहा यांच्या भविष्यातील राजकीय प्रवासासाठी महत्त्वाचे आहे.”जर मोदींची निवृत्ती झाली, तर शहांच्या हातातील सत्ता, गृहमंत्रीपद टिकेल का, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते.
मोदींचा संदेश – एनडीएसाठी की अमित शहांसाठी?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपल्याला खूप लांब खेळी खेळायची आहे.” हे विधान खरेतर एनडीएसाठी होते की अमित शहांसाठी, यावर वानखेडे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.किरण रिजिजू यांनी हे विधान संपूर्ण युतीसंदर्भात असल्याचे सांगितले, परंतु वानखेडे यांना ते थातूरमातूर स्पष्टीकरण वाटते. त्यांच्या मते, “सर्वसामान्य जनतेला, विशेषतः नागपूरसारख्या ठिकाणी, एकच संदेश गेला की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सर्वोच्च राहणार आहेत.”
रेड कार्पेट शहा यांच्यासाठी?
वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, जरी नरेंद्र मोदी ७५ वर्षांनंतर सेवानिवृत्त झाले किंवा २०२९ नंतर निवडणूक लढवली नाही, तरी कालच्या बैठकीत “मोदींनी अमित शहा यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे.”भाजपमध्ये सध्या काय निर्णय घेतले जातात, यावर संघ, संघटना, संसदीय बोर्ड, खासदार यांना काही किंमत उरलेली नाही, असेही ते स्पष्ट करतात.इतकेच नाही, तर २०१४ साली मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही भाजपच्या संसदीय दलाची बैठक झालेली नव्हती. थेट एनडीएची बैठक झाली आणि मोदी पंतप्रधान झाले,असे भारताच्या इतिहासात प्रथमच घडले.
एनडीएच्या घटक पक्षांची भूमिका दुय्यमच?
वानखेडे असेही म्हणतात की, “एनडीएच्या घटक पक्षांना केंद्रात समान दर्जा दिला जात नाही, तर राज्यात तो दिला जाईल का?” एनडीएतील महत्त्वाची मंत्रालये केवळ भाजपकडेच आहेत, हेही ते अधोरेखित करतात.
निष्कर्ष – पुढचा पंतप्रधान अमित शहा?
या बैठकीतून बाहेर पडलेला संदेश स्पष्ट आहे , “पुढील पंतप्रधान अमित शहा असू शकतात.” तो कधी होतील, हे सांगता येणार नाही, पण मोदी यांच्या भाषणाचा रोख तसाच असल्याचे वानखेडे यांचे स्पष्ट निरीक्षण आहे.
