नांदेडः देशाचे माजी गृहमंत्री श्रध्देय डॉ.शंकरराव चव्हाण व श्रध्देय सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुविद्य पत्नी व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी सौ.स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांचे अल्पशा आजाराने आज येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. उद्या दि. 2 रोजी सकाळी 10 वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
80 वर्षीय सौ.स्नेहलता पाटील खतगावकर यांना काही दिवसांपूर्वी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच खतगावकर व चव्हाण कुटुंबियांसह संपूर्ण जिल्हयावर शोककळा पसरली.
सौ.स्नेहलता पाटील या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या.श्री साईबाबा व श्री सत्यसाईबाबा यांच्या त्या निस्सीम भक्त होत्या. श्री सत्यसाईबाबा यांच्या सेवेत त्या इतक्या विलिन झाल्या होत्या की त्या नित्यनेमाने श्री साईबाबा व श्री सत्यसाईबाबा यांचे भजन व आराधना करीत असत. त्यांनी अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता.
सौ.स्नेहलता पाटील या नांदेड जिल्हयाच्या राजकारणात सुध्दा सक्रिय होत्या. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सहभाग घेवून त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.
सौ.स्नेहलता पाटील यांची उद्या दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता राजेंद्रनगर मधील साईसदन या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.त्यानंतर त्यांच्यावर येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती भास्करराव पाटील खतगावकर, बंधू माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, मुलगा निरंजन पाटील खतगावकर, स्नुषा डॉ.मीनल पाटील खतगावकर, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, भाच्या आ.श्रीजया चव्हाण व सुजया चव्हाण, पुतणे रवि पाटील खतगावकर यांच्यासह चार बहिणी व मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल जिल्हयातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
