नांदेड– शहरातील मगनपुरा, नाईक नगर आणि नायगाव भागात सोनसाखळ्या व रोख रकमेच्या चोरीचे सलग तीन प्रकार घडले असून, दोन प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पहिली घटना 30 जुलै रोजी रात्री 9.30 च्या सुमारास मगनपुरा भागात घडली. उज्वला गोपाल बियाणी या आपल्या घरी पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 307/2025 नुसार नोंद करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक कदम पुढील तपास करीत आहेत.
दुसरी घटना याच दिवशी सायंकाळी 9.15 वाजेच्या सुमारास नाईक नगर भागात घडली. उर्मिला लक्ष्मण सोनटक्के या आपल्या मुलीसह शतपावली करत असताना, दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने खेचून नेली. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 289/2025 नुसार याची नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक साखरे अधिक तपास करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, नायगाव तालुक्यातील खैरगाव येथील पेट्रोल पंपावर काम करणारे संभाजी गोविंद जाधव यांच्याकडून तुषार माधव गंगासागर या व्यक्तीने खंजिराचा धाक दाखवत 2200 रुपये जबरदस्तीने लंपास केले. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 172/2025 भारतीय न्याय संहिते अंतर्गत नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक तोटेवाड यांच्याकडून तपास सुरू आहे.या तीन पैकी दोन घटनांतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याची अधिकृतरित्या माहिती प्रेस नोट मध्ये देण्यात आली आहे.
