मुंबई ,(प्रतिनिधी)- पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रशासकीय अडचणी मांडता याव्यात यासाठी राज्यभरात प्रत्येक घटकात ” आज्ञांकित कक्ष ” दर शुक्रवारी आयोजित करण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना परिपत्रक पाठवण्यात आले असून, यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, आता कोणत्याही लांबट प्रक्रियेविना पोलीस अधिकारी व अंमलदार हे दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत थेट पोलीस घटक प्रमुखांना भेटून आपले प्रश्न मांडू शकतील.या आज्ञांकित कक्ष कक्षाच्या निर्णयाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची मान्यता असून, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
पोलीस दलातील कर्मचारी अनेक वेळा दैनंदिन कामाच्या ताणतणावामुळे, प्रशासकीय प्रक्रियांच्या गुंतागुंतीमुळे, तसेच वैयक्तिक व कौटुंबिक अडचणीमुळे मानसिक दबावात असतात. परिणामी, त्यांची कार्यक्षमता व मनोबल कमी होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून ‘ आज्ञांकित कक्ष ’ उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या कक्षांमध्ये पुढीलप्रमाणे अडचणी ऐकल्या जातील:
बदली प्रक्रिया
वेतन व भत्ते
बक्षीस व सेवा नोंदी
गैरहजेरी कालावधी संबंधित प्रश्न
शासकीय निवासस्थान
मुलांच्या शैक्षणिक गरजा व शिष्यवृत्ती
पोलीस कल्याण योजना
वैद्यकीय सुविधा व उपचार
कार्यप्रदर्शन संबंधित तक्रारी
कर्तव्य बजावतांना येणाऱ्या अडचणी
या बैठकीदरम्यान येणाऱ्या तक्रारींची योग्य नोंद ठेवण्यासाठी एक स्वतंत्र नोंदवही देखील ठेवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये प्राप्त तक्रारी आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशील लिहिणे बंधनकारक असेल. वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या भेटी दरम्यान या नोंदवहीची तपासणी करतील.जर घटक प्रमुख दिलेल्या वेळेत अनुपलब्ध असतील, तर त्यांनी त्यांच्या सोयीच्या वेळेत ही प्रक्रिया राबवावी. अडचणींचे निराकरण प्राधान्याने करून संबंधितांना समुपदेशन देणेही आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.या उपक्रमामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होईल, कार्यक्षमता वाढेल आणि त्यांच्या कडून प्रशासनाला उपयुक्त माहिती देखील मिळू शकते, असे पोलीस महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे
