नांदेड,(प्रतिनिधी)-मरखेल पोलिसांनी 27 जुलै रोजी एका चारचाकी वाहनातून सुमारे 36,400 रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. या वाहनाची किंमत सुमारे सात लाख रुपये असून, एकूण मुद्देमालाची रक्कम 7,36,400 रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मरखेल पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पांढऱ्या रंगाची टोयोटा कार (क्रमांक केए 38 एन 3169) थांबवून तपासणी केली. तपासणीत गाडीमध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
या प्रकरणी पांडुरंग नारायण यांगळे यांच्या तक्रारीवरून मरखेल पोलिसांनी बबन पिराजी फुलेवाड (वय 32) आणि प्रकाश पांडुरंग कोकणे (वय 30, दोघेही रा. हंगरगा, ता. औंढा, जि. बिदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भादंवि कलम 188 अंतर्गत गुन्हा क्रमांक 86/2025 नोंदवण्यात आला आहे.या कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर,पोलीस अंमलदार विलास पवार,यांनी सुद्धा परिश्रम घेतले.
